मुंबई: कोच्चीमध्ये 23 डिसेंबरला IPL 2023 साठी लिलाव होणार आहे. प्रत्येकाच्या नजरा या लिलावावर आहेत. या छोट्या लिलावासाठी 991 खेळाडूंनी आपलं नाव रजिस्टर केलय. या लिलावात फक्त 80 ते 85 खेळाडूंची खरेदी होऊ शकते. पुन्हा एकदा परदेशी खेळाडूंवर नजर असेल. पण प्रत्येक परदेशी खेळाडूची विक्री होईल, हे शक्य नाहीय. काही खेळाडूंच नशीब पालटेल. खासकरुन 2 कोटी पेक्षा जास्त बेस प्राइस असलेल्या खेळाडूंची निराशा होऊ शकते. या आयपीएल लिलावात 21 खेळाडूंची बेस प्राइस 2 कोटी रुपये आहे.
एंजेलो मॅथ्यूज
श्रीलंकेचा हा दिग्गज ऑलराऊंडर आहे. मागच्या 2-3 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅथ्यूज फक्त आता एक कसोटी फलंदाज म्हणून उरला आहे. 35 वर्षाच्या या खेळाडूचा टी 20 मध्ये रेकॉर्ड फार चांगला नाहीय. सध्या तो लंका प्रीमियर लीगमध्ये खेळतोय. तिथे तो एक-दोन चांगल्या इनिंग्स खेळलाय. लंका लीग आणि आयपीएल यांचा जो स्तर आहे, त्यात बरीच तफावत आहे. अशावेळी 120 स्ट्राइक रेट असलेल्या या खेळाडूला कदाचितच कुठली टीम विकत घेईल. त्याची बेस प्राइस 2 कोटी रुपये आहे.
टायमल मिल्स
इंग्लंडच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. पण तो काही निवडक सामने खेळला. त्यात तो प्रभावी ठरला नाही. तो इंग्लंडच्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग होता. पण टुर्नामेंटमध्ये एकही सामना खेळला नाही. 30 वर्षाच्या या गोलंदाजाचा भारतीय विकेटवर रेकॉर्ड इतका चांगला नाहीय. मिल्सने 2022 नंतर एकही सामना खेळलेला नाहीय.
जेमी ओवर्टन
इंग्लंडकडून हा खेळाडू टेस्ट क्रिकेट खेळलाय. 2 कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर त्याने रजिस्टर केलय. जेमी ओवर्टन एक ऑलराऊंडर आहे. टी 20 करीअरमध्ये 173 च्या स्ट्राइक रेटने 500 पेक्षा जास्त धावा केल्यात. गोलंदाजीत त्याची इकॉनमी 9 रन्सपेक्षा जास्त आहे.
क्रेग ओवर्टन
क्रेग ओवर्टन मोठ्या उंचीचा मध्यमगती गोलंदाज आहे. पण त्याचं टी 20 करिअर फार प्रभावी नाहीय. त्याने 70 सामन्यात 70 विकेट घेतल्यात. प्रतिओव्हर त्याने 9 धावा दिल्यात. बॅटने त्याचा स्ट्राइक रेट 123 आहे. 2 कोटी त्याची किंमत आहे. पण त्याला कोणी विकत घेण्याची शक्यता कमी आहे.
नाथन कूल्टर नाइल
ऑस्ट्रेलियाचा हा अनुभवी क्रिकेटर आहे. टी 20 चा स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. अनेक सीजनपासून त्याचं आयपीएलशी नातं आहे. प्रत्येक सीजनच्या लिलावात तो असतो. कोणी ना कोणी, या खेळाडूला विकत घेतो. 35 वर्षाचा हा खेळाडू गोलंदाजी बरोबर उपयोगी हिटर सुद्धा आहे. मागच्या सीजनमध्ये तो फक्त एक सामना खेळला होता. त्याच्यावर टीम्स खर्च करण्याची शक्यता कमी आहे.