KKR vs RCB IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या सीजनला अधिक रोमांचक बनवण्यासाठी बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेयरचा नियम आणलाय. पहिल्या आठ सामन्यात या इम्पॅक्ट प्लेयरचा प्रभाव दिसला नाही. पण अखेरकार कोलकाता नाइट रायडर्सला या इम्पॅक्ट प्लेयरचा फायदा झाला. कोलकाताने ज्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरवलं, त्याच्याबद्दल फार काही माहित नव्हतं, त्याला आधी कोणी ओळखत नव्हतं. कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर गुरुवारी रात्री टॉप क्लास स्पिन गोलंदाजी पहायला मिळाली. मोठ-मोठे फलंदाज स्पिन खेळताना निष्प्रभ झाले.
कोलकाता नाइट रायडर्सचा दिग्गज स्पिन गोलंदाज सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीची ‘मिस्ट्री स्पिन’ बऱ्याच वर्षांपासून प्रतिस्पर्धी टीम्सना गार करत आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात या दोघांशिवाय आणखी एक तिसरा मिस्ट्री स्पिनर सुयश शर्माचा जलवा पहायला मिळाला.
IPL 2023 मधला सर्वात मोठा इम्पॅक्ट प्लेयर
अवघ्या 19 वर्षांचा दिल्लीचा स्पिनर सुयश शर्माला कोलकाताने आपल्या बॅटिंग नंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरवलं. हा रिस्ट स्पिनर गोलंदाजीला येण्याआधीच नरेन आणि चक्रवर्तीने बँगोलरच्या टीमला धक्के दिले होते. त्यानंतर त्यांचा विजय कठीण दिसत होता, पण काही अपेक्षा शिल्लक होत्या. त्याला KKR च्या सुयश शर्माने सुरुंग लावला. 11 व्या ओव्हरमध्ये सुयश पहिल्यांदा गोलंदाजीसाठी आला. मायकल ब्रेसवेलने त्याला सिक्स मारला.
पुढच्या ओव्हरमध्ये सुयशचा परिणाम दिसून आला. चार चेंडूंमध्ये त्याने अनुज रावत आणि दिनेश कार्तिकची विकेट काढली.
असा दाखवला इम्पॅक्ट
सुयशने 4 ओव्हरमध्ये 30 धावा देऊन 3 विकेट काढल्या. आपल्या टीमच्या विजयात योगदान दिलं. याआधी 8 सामन्यात कुठलाही इम्पॅक्ट प्लेयर अशी कामगिरी करु शकला नव्हता. एकदिवस आधीच राजस्थान रॉयल्सकडून 22 वर्षाच्या ध्रुव जुरेलने आपल्या डेब्युमध्ये आक्रमक बॅटिंग केली होती. पण तो टीमला विजय मिळवून देऊ शकला नव्हता.
ओळख हीच एक मोठी मिस्ट्री
रिस्ट स्पिनर्सना मिस्ट्री स्पिनर म्हटलं जातं. सुयश बद्दल खरीच मिस्ट्री होती. स्पिनपेक्षा त्याची ओळख हीच एक मोठी मिस्ट्री होती. कारण त्याच्या बद्दल काही खास माहिती नव्हती. मॅच नंतर कॅप्टन नितीश राणाने हेच सांगितलं, आयपीएलमध्ये येण्याआधी सुयश बद्दल काहीच माहित नव्हतं. दोघेही दिल्लीचे क्रिकेटर आहेत.
मोठी रक्कम बाजूला काढलेली
कोलकाता नाइट रायडर्सने सुयशला 20 लाख रुपयाच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं. फ्रेंचायजीने सुयशला विकत घेण्यासाठी मोठी रक्कम बाजूला काढून ठेवली होती. पण सुयश केकेआरला बेस प्राइसच्या रक्कमेमध्येच मिळाला. केकेआरचे सीईओ वेंकी मैसूरने या बद्दल खुलासा केला.
जे बोलला ते करुन दाखवलं
दिल्लीच्या सुयश शर्माने सीनियर लेव्हलवर कुठलाही देशांतर्गत सामना खेळलेला नाहीय. सुयशने रेवस्पोर्ट्ज़ यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. त्यात त्याने दिल्लीसाठी अंडर 25 क्रिकेट खेळल्याची माहिती दिली. मोठ्या भावाने क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केल्याच त्याने सांगितलं. सुयशच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याला आपल्या क्ष्मतेवर पूर्ण विश्वास आहे. या सीजनमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली, तर त्यासाठी तयार आहे असं त्याने आधीच सांगितलं होतं. मिळालेल्या संधीचा त्याने फायदा सुद्धा उचलला.