लखनौ : केएल राहुलची टीम लखनौ सुपर जायंट्स आयपीएल 2023 मध्ये 7 पैकी 4 सामने जिंकून चौथ्या स्थानावर आहे. लखनौचा या सीजनमध्ये परफॉर्मन्स चांगला आहे. टॉप 4 मध्ये ही टीम आपलं स्थान टिकवून आहे. दुसऱ्याबाजूला या टीममधील एक प्लेयर लखनौचा प्राण आहे. एकवेळ या प्लेयरवर खाण्या-पिण्यासाठी भटकण्याची वेळ आली होती. तो डिप्रेशनमध्ये सुद्धा गेला होता. त्यानंतर वडिलांनी या खेळाडूला पुन्हा उभ केलं. आज तो लखनौ सुपर जायंट्स टीमचा महत्वाचा खेळाडू बनलाय.
आम्ही बोलतोय काइल मेयर्सबद्दल. तो कॅरेबियाई ऑलराऊंडर आहे. 2021 मध्ये मेयर्स राजस्थान रॉयल्सच्या टीमसोबत रिझर्व्ह खेळाडू म्हणून जोडला गेला.
लखनौने किती लाखांमध्ये विकत घेतलं?
कोरोनामुळे लीगचा दुसरा टप्पा यूएईमध्ये होता. त्यावेळी फ्रेंचायजीने त्याला पुन्हा बोलवलं नाही. पुढच्या म्हणजे 2022 च्या सीजनमध्ये लखनौने 50 लाख रुपयाच्या बेस प्राइसला काइल मेयर्सला विकत घेतलं, तेव्हापासून तो कमालीचा खेळ दाखवतोय.
चालू सीजनमध्ये किती हाफ सेंच्युरी झळकवल्या?
30 वर्षाच्या मेयर्सने नेहमीच आयपीएल खेळण्याचा स्वप्न पाहिलं होतं. या सीजनमध्ये त्याच हे स्वप्न साकार झालं. आय़पीएल 2023 मध्ये अजूनपर्यंत तो 7 सामने खेळलाय. सीजनची सुरुवात त्याने सलग 2 अर्धशतक ठोकून केली होती. आतापर्यंत त्याने 3 फिफ्टी मारल्या आहेत. मेयर्सने आज आपली वेगळी ओळख बनवलीय. इथपर्यंत पोहोचणं मेयर्ससाठी अजिबात सोपं नव्हतं. 2017 मध्ये ट्रेनिंग कॅम्पसाठी तो डोमिनिकाला गेला होता.
चक्रीवादळात फसला
डोमिनिका बेटावर आलेल्या चक्रीवादळात मेयर्स अडकला होता. ज्या अपार्ट्मेंटमध्ये तो उतरलेला, तिथलं छप्पर उडून गेलं होतं. खाण्या-पिण्यासाठी भटकण्याची वेळ त्याच्यावर ओढवलेली. अखेर पोलिसांनी त्याची मदत केली. 2018 मध्ये त्याला दुखापत झाली. त्याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला. गोलंदाजीचा वर्कलोड कमी करण्यासाठी त्याने फलंदाजीवर लक्ष देऊन ऑलराऊंडर बनला. फिट होऊनही कॅरेबियन प्रीमियर लीगच क़ॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं नव्हतं. तो डिप्रेशनमध्ये गेलेला.
वडिलांनी दिला हात
मेयर्स फिट होऊन पुनरागमनच्या तयारीत होता, त्याचवेळी कोरोना व्हायरसमुळे पुन्हा खंड पडला. या कठीण काळत वडिल कोचच्या भूमिकेतून त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले. मेयर्सला घरातच चांगली कोचिंग मिळाली. वडिलांनी मेयर्सच्या बॅटिंग स्टान्समध्ये बरीच सुधारणा केली. आज मेयर्स आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवतोय.