मुंबई : टीम इंडिया 12 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच T20 सामने खेळणार आहे. टीम इंडियाने सर्व फॉर्मेटमधील सीरीजसाठी 2019 मध्ये शेवटचा वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. त्यावेळी प्रत्येक फॉर्मेटमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता. यावेळी टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी दिलीय. या दरम्यान एका युवा खेळाडूने मैदानावर होणाऱ्या स्लेजिंगबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा केलाय.
IPL 2023 चा स्टार यशस्वी जैस्वालचा वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजसाठी टीम इंडियात समावेश केलाय. जैस्वालच मागच्यावर्षी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात खेळताना स्वत:वरच नियंत्रण सुटलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
अजिंक्य रहाणे त्या मॅचमध्ये कॅप्टन
जैस्वालला अजिंक्य रहाणने मैदानाबाहेर पाठवून दिलं होतं. त्या घटनेबद्दल आता यशस्वी जैस्वालने द लल्लनटॉपमध्ये खुलासा केलाय. “आक्रमकता महत्वपूर्ण आहे. मी मानसिक दृष्ट्या आक्रमक आहे. अनेकदा ही आक्रमकता बाहेर येते. त्यावेळी मी जास्त काही बोललो नव्हतो. काहीवेळा अशा गोष्टी घडतात, त्याबद्दल बोलून काय फायदा” असं यशस्वी जैस्वाल म्हणाला.
‘….तर मी थोडी ऐकून घेईन’
यशस्वी जैस्वालला स्लेजिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तो म्हणाला की, “हे सगळ्यांसोबत घडतं. अनेकदा याबद्दल कोणाला काही समजत नाही. कोण काय बोलतं? यावर बरच काही अवलंबून असतं. कोणी मला माझ्या आई-बहिणीबद्दल बोललं, तर मी थोडी ऐकून घेईन” असं यशस्वी म्हणाला.
दोन्ही देशांमधील 100 वा कसोटी सामना
टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला दोन टेस्ट मॅचने सुरुवात होणार आहे. 2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलची सुरुवात होईल. डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये 12 ते 16 जुलै दरम्यान पहिला कसोटी सामना होईल. दुसरी टेस्ट मॅच 20 ते 24 जुलै दरम्यान त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये होईल. भारत आणि वेस्ट इंडिजमधला दुसरा कसोटी सामना हा दोन्ही देशांमधील 100 वा कसोटी सामना आहे. ही टेस्ट सीरीज यशस्वी जैस्वालसाठी खूप खास आहे. त्याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होऊ शकतो.