नवी दिल्ली : T20 क्रिकेटमध्ये फिनिशरचा रोल खूप महत्वाचा असतो. चांगला फिनिशर असेल, तर मॅच कधीही पलटू शकते. क्रिकेट विश्वातील महान फिनिशर्समध्ये महेंद्र सिंह धोनीचा समावेश होतो. त्याने अनेकदा फिनिशिंगचा रोल चोख बजावलाय. आयपीएल 2023 मध्ये असेच फिनिशर्स दिसलेत, ज्यांनी टीमसाठी उपयुक्त योगदान दिलय. टीमसाठी ते परफेक्ट फिनिशर ठरलेत.
हे युवा खेळाडू असून ते टीम इंडियाकडून अजून खेळलेले नाहीत. आपल्या प्रदर्शनातून मोठी जबाबदारी निभावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, हे त्यांनी दाखवून दिलय. टीमला जिंकून देण्याची त्यांची क्षमता आहे.
राजस्थानकडे आहे असा फिनिशर
राजस्थान रॉयल्सने दोन सीजन युवा फलंदाज ध्रुव जुरैलला बसवून ठेवलं. या सीजनमध्ये त्याला संधी दिली. त्याने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. त्याने राजस्थानला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं व विजय सुद्धा मिळवून दिला. जुरैलने सात मॅचेसमध्ये 130 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 196.96 चा आहे.
RCB विरुद्ध जुरैलने 16 चेंडूत 34 धावा फटकावल्या. त्याने टीमला विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सुद्धा जुरैलने 15 चेंडूत 3 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 34 धावा केल्या. टीमला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.
KKR ला नवीन फिनिशर सापडला
KKR कडे आंद्र रसेलसारखा तुफानी बॅटिंग करणारा फलंदाज आहे. पण आता त्यांच्याकडे रिंकू सिंहच्या रुपाने दमदार फिनिशर आहे. केकेआरसाठी रिंकू फिनिशरचा रोल निभावतोय. रिंकूने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात 5 चेंडूत 5 सिक्स मारुन केकेआरला थरारक विजय मिळवून दिला. या खेळातून त्याची क्षमता दिसून आली.
रिंकूने 8 मॅचमध्ये 251 धावा केल्या. 158.86 चा त्याचा स्ट्राइक रेट आहे. त्याने दोन अर्धशतकं झळकवली आहेत. रिंकू क्रीजवर असताना समोरची टीम टेन्शनमध्ये येते.
गुजरातला सापडला चौथा फिनिशर
गुजरात टायटन्सच्या टीममध्ये तीन-तीन फिनिशर आहेत. डेविड मिलर बद्दल सगळ्यांनाच माहित आहे. राहुल तेवतिया सुद्धा गरज असताना वेगाने धावा बनवू शकतो. राशिद खानही गरज पडते, तेव्हा बॅट चालवतो. या तिघांशिवाय गुजरात टायटन्सकडे अभिनव मनोहरच्या रुपाने चौथा फिनिशर आहे.
अभिनव मनोहरने अलीकडेच मुंबई इंडियन्स विरुद्ध तुफानी बॅटिंग केली. त्याने 21 चेंडूत 42 धावा चोपल्या. अभिनव या सीजनमध्ये चार सामने खेळलाय. त्याने 182.97 च्या स्ट्राइक रेटने 86 धावा केल्या आहेत.
पंजाबकडे जितेश शर्मा
पंजाब किंग्सचा युवा विकेटकीपर फलंदाज जितेश शर्माने मागच्या सीजनमध्ये आपली क्षमता दाखवून दिली होती. या सीजनमध्ये तो अजून घातक बनलाय. मागच्या सीजनमध्ये जितेश 12 मॅच खेळला होता. या सीजनमध्ये जवळपास प्रत्येक मॅचमध्ये तो आहे. त्याने आठ सामन्यात 157.94 च्या स्ट्राइक रेटने 169 धावा केल्या आहेत.
जितेश मोठी इनिंग खेळलेला नाही. पण त्याने कमी चेंडूत जास्त धावा केल्या आहेत. शुक्रवारी लखनौ विरुद्ध तो 24 रन्सची छोटी इनिंग खेळला. पण यासाठी त्याने 10 चेंडू घेतले.