बंगळुरु: मागच्या दोन दिवसांपासून बंगळुरुमध्ये सुरु असलेला TATA IPL 2022 Mega Auction चा सोहळा अखेर संपला आहे. एकूण 600 खेळाडूंची मेगा ऑक्शनसाठी निवड झाली होती. पण त्यातल्या 203 खेळाडूंची फ्रेंचायजींनी खरेदी केली. यंदा आयपीएलमध्ये आठ नाही, तर दहा संघ मैदानावर खेळताना दिसणार आहे. यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow super giants) आणि गुजरात टायटन्स (Gujarat titans) हे दोन नवीन संघ आहेत. या मेगा ऑक्शनआधी जुन्या आठ फ्रेंचायजींनी चार खेळाडूंना रिटेन केलं, तर नव्याने आलेल्या दोन संघांनी प्रत्येकी तीन खेळाडू ड्राफ्ट पद्धतीने निवडले. नियमामनुसार, प्रत्येक फ्रेंचायजीकडे खेळाडू विकत घेण्यासाठी 90 कोटींची रक्कम होती. खेळाडूंना रिटेन आणि ड्राफ्ट केल्यानंतर प्रत्येक फ्रेंचायजीच्या पर्समध्ये जी रक्कम उरली, त्यातून त्यांना मेगा ऑक्शनमध्ये बोली लावायची होती.
अनकॅप्ड खेळाडूही झाले मालमाल
पंजाब किंग्सच्या पर्समध्ये सर्वाधिक 72 कोटीची रक्कम होती. त्यामुळे मागचे दोन दिवस ते खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसले. इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. दीपक चहर, श्रेयस अय्यर, आवेश खान, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा या भारतीय खेळाडूंना 10 कोटी व त्यापेक्षा जास्त रक्कम मिळाली. अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेल्या अनकॅप्ड खेळाडूंवरही मोठी बोली लागली.
66 परदेशी खेळाडू
अनेक भारतीय खेळाडू मेगा ऑक्शनमुळे मालामाल झाले. बेस प्राइस 20 लाख रुपये असूनही फ्रेंचायजींनी मुक्तहस्ते त्यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये 1O संघांनी एकूण 203 खेळाडूंना विकत घेतलं. यात 66 परदेशी खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंवर फ्रेंचायजींनी 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. 203 खेळाडूंच्या खरेदीसाठी फ्रेंचायजींनी तब्बल 549 कोटी रुपये मोजले.