इशान किशनला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स काहीही करेल, असं काही दिवसांपूर्वी क्रिकेट एक्सपर्ट आकाश चोप्रा यांनी म्हटलं होतं आणि आज घडलं सुद्धा तसंच. इशानसाठी मुंबई इंडियन्सने त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली व 15.25 कोटींना विकत घेतलं. यापूर्वी मुंबईने कधीही 10 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली नाही.
इशानमध्ये असं काय आहे? की, मुंबईने त्याच्यासाठी इतकी बोली लावली. खरंतर इशानकडे मोठे फटके खेळण्याचं कौशल्य आहे. कुठल्याही क्षणी तो सामना फिरवू शकतो. डावखुरा आक्रमक फलंदाज अशी त्याची ख्याती आहे. सध्या भारतीय संघाकडून खेळणाऱ्या इशानने आपण संयमी फलंदाजीही करु शकतो, हे दाखवून दिलं आहे. त्यामुळेच त्याच्यावर इतकी बोली लागली, असे क्रिकेट एक्सपर्ट म्हणतात.
इशान किशनकडे विकेटकिपिंगचेही कौशल्य आहे. तो डावखुरा फलंदाज आहे. आतापर्यंत चार सीजमध्ये त्याने 136.33 च्या सरासरीने 1452 धावा केल्या आहेत.
2020 मध्ये मुंबईच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने 516 धावा केल्या होत्या. 2018 पासून इशान किशन मुंबईकडून खेळतोय. त्यावेळी त्याला 5.5 कोटींना विकत घेतलं होतं.
मागच्या सीजनमध्ये मुंबईकडून खेळताना इशानने 241 धावा केल्या होत्या. इशानवर मुंबईने इतकी रक्कम खर्च केलीय, त्यामागे त्याचं वय हे देखील एक कारण आहे. तो आता अवघ्या 23 वर्षांचा आहे. पुढची अनेकवर्ष आयपीएलमध्ये मुंबईच्या विजयात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.