मुंबई: IPL 2023 साठी येत्या 23 डिसेंबरला कोच्चीमध्ये लिलाव पार पडणार आहे. ऑस्ट्रेलियाचा एडम जाम्पा आणि इंग्लंडच्या आदिल रशीद पैकी एक मुंबई इंडियन्ससाठी योग्य ठरेल, असं टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचं मत आहे. पाचवेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी 2022 चा सीजन खूपच खराब होता. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम तळाला होती. मुंबईला चांगल्या फिरकी गोलंदाजाची गरज आहे.
दोघे प्रमुख लेगस्पिनर
मांजरेकर यांच्यामते मुंबईसाठी जम्पा आणि रशीद यांच्यापैकी एकजण योग्य ठरेल. जम्पा आणि रशीद दोघे आपआपल्या टीमचे प्रमुख लेग स्पिनर आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही टीम्स धावगतीला लगाम घालण्यासाठी आणि विकेट घेण्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.
हे मुंबई इंडियन्सचे दोन घातक खेळाडू
“मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणाचा विचार केला, तर मागच्यावेळी त्यांना नुकसान सहन करावं लागलं होतं. आता जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह दोघेही फिट आहेत. त्यांच्याकडे जेसन बेहरेनडॉर्फ आहे. चांगल्या गुणवत्तेचे हे गोलंदाज आहेत” असं संजय मांजरेकर म्हणाले.
रोहितला ही गोष्ट समजली असेल
बॅटिंगमध्ये रोहित शर्मा फॉर्ममध्ये येताना दिसतोय. तो प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. “राशिद खान आणि सुनील नरेन सारख्या लेग स्पिनरची गरज रोहितच्या लक्षात आली असेल. त्यामुळे तो सुद्धा अशा गोलंदाजाच्या शोधात आहे” असं संजय मांजेरकर म्हणाले. ते स्टार स्पोर्ट्सवरील ‘गेम प्लान ऑक्शन स्पेशल’ कार्यक्रमात बोलत होते.
मुंबई इंडियन्समध्ये बदलाची गरज
जम्पा आणि रशीदने आपल्या कौशल्याने आयपीएलमध्ये आपल महत्त्व सिद्ध केलेलं नाहीय. जम्पाने 14 आयपीएल सामन्यात 7.74 च्या इकॉनमीने 21 विकेट घेतल्यात. 6/19 हे त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. रायजिंग पुणे सुपरजायंटसाठी तो पहिल्यांदा खेळला होता. दुसऱ्याबाजूला रशीद आयपीएल 2021 मध्ये पंजाब किंग्ससाठी फक्त एक सामना खेळला.