मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आज दिल्ली कॅपिटल्सचा (RCB vs DC) 16 धावांनी पराभव केला. RCB चा यंदाच्या सीजनमधील हा चौथा विजय आहे. दिल्लीचा तिसरा पराभव आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) नाबाद 66, ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) 55 शाहबाज अहमद नाबाद 32 आणि जोश हेझलवूड यांनी आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 189 धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी 190 धावांच लक्ष्य दिलं होतं. पण त्यांनी निर्धारित 20 षटकात सात बाद 173 धावा केल्या. RCB चा मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला होता. आजच्या विजयाने त्यांनी जोरदार कमबॅक केलं आहे.
आरसीबीच्या आजच्या विजयाचं सर्वाधिक श्रेय दिनेश कार्तिकला जातं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या पाच बाद 92 धावा झाल्या होत्या. त्यावेळी दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. कठीण परिस्थिती होती. पण दिनेश कार्तिकने कुठलाही दबाव न घेता आपला खेळ सुरु ठेवला. त्याने 34 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार होते. सहाव्या विकेटसाठी दिनेश आणि शाहबाज अहमदमध्ये 55 चेंडूत नाबाद 97 धावांची भागीदारी झाली. दिनेशच्या या वादळी खेळीमुळेच आरसीबीला 189 ही डोंगराएवढी धावसंख्या उभारता आली. दिनेशच्या आधी फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि अनुज रावत हे आघाडीचे तीन फलंदाज लवकर बाद झाले होते. पण मॅक्सवेलने कुठलाही दबाव न घेता फटकेबाजी सुरु ठेवली. त्याने 34 चेंडूत 55 धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकार होते.
Back to winning ways. ??
Important 2️⃣ points secured. ✅We look ahead to our next challenge now! ??#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #DCvRCB pic.twitter.com/bPzMfO2lPg
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 16, 2022
दिल्लीची सुरुवात चांगली झाली होती. पाच षटकात त्यांच्या 50 धावा झाल्या होत्या. डेविड वॉर्नर आऊट झाल्यानंतर दिल्लीला ती गती कायम राखता आली नाही. वॉर्नरने 38 चेंडूत 66 धावा फटकावल्या. हसरंगाने त्याला पायचीत पकडलं. वॉर्नरने चार चौकार आणि पाच षटकार लगावले. 112 ते 115 दरम्यान म्हणजे तीन धावात दिल्लीच्या तीन विकेट गेल्या. तिथेच दिल्लीचा संघ बॅकफूटवर गेला. ऋषभ पंत खेळपट्टीवर असेपर्यंत विजयाच्या आशा कायम होत्या. पण सिराजच्या गोलंदाजीवर कोहलीने त्याचा 34 धावांवर एकाहाताने जबरदस्त झेल घेतला. तिथेच सामना दिल्लीच्या हातून निसटला. दिल्लीने निर्धारित 20 षटकात सात बाद 173 धावा केल्या.