MI vs PBKS IPL Mathc Result: कायरन पोलार्डची संथ गती Mumbai Indians ला महाग पडली, जाणून घ्या पराभवाची कारणं

| Updated on: Apr 14, 2022 | 12:10 AM

MI vs PBKS IPL Mathc Result: यंदाच्या सीजनमधला मुंबईचा खेळ पाहिला की, हाच तो संघ का? असा प्रश्न पडतो. एकापाठोपाठ एक मुंबई इंडियन्सला पाच पराभवांना सामोर जावं लागलं आहे.

MI vs PBKS IPL Mathc Result: कायरन पोलार्डची संथ गती Mumbai Indians ला महाग पडली, जाणून घ्या पराभवाची कारणं
कायरन पोलार्ड
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधला सर्वात यशस्वी संघ आहे. या टीमने आतापर्यंत तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. अशी कामगिरी अजून दुसऱ्या कुठल्याही संघाला करता आलेली नाही. पण यंदाच्या सीजनमधला मुंबईचा खेळ पाहिला की, हाच तो संघ का? असा प्रश्न पडतो. एकापाठोपाठ एक मुंबई इंडियन्सला पाच पराभवांना सामोर जावं लागलं आहे. आज पंजाब किंग्सने (Punjab kings) मुंबई इंडियन्सला 12 धावांनी नमवलं. मुंबईला विजयासाठी 199 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण मुंबई इंडियन्सला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 186 धावांच करता आल्या. मेगा ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने नव्याने संघ बांधणी केली आहे. पण अजूनही या संघाची घडी बसलेली नाही. मुंबई इंडियन्सची टीम अजूनही चाचपडतेय. पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला सहाव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सर्वात तळाला आहे. मुंबई इंडियन्सच्या या स्थितीवर कोणाला विश्वास बसणार नाही, पण हे आजचं वास्तव आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवामागे काय कारण आहेत, ते समजून घेऊया.

  1. मुंबई इंडियन्सला पावरप्लेच्या ओव्हर्समध्ये विकेट काढता आली नाही. पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवाल आणि शिखर धवनने फटकेबाजी केली. त्यांनी 97 धावांची सलामी दिली. मयंक आणि शिखरने सहजपणे मुंबईची गोलंदाजी खेळून काढली.
  2. पंजाब किंग्सकडून शिखर धवनने सर्वाधिक 70 आणि मयंक अग्रवालने 52 धावांची खेळी केली. त्यानंतर जितेश शर्मा 30 आणि शाहरुख खानने 15 केलेली फटकेबाजी सुद्धा महत्त्वाची ठरली. धवन-अग्रवालने पाया रचल्यानंतर या दोघांनी धावांचा वेग कमी होऊ दिला नाही.
  3. जसप्रीत बुमराह वगळता मुंबईचा एकही गोलंदाज प्रभावी वाटला नाही. त्यांना पंजाबच्या फलंदाजांना वेसणच घालता आली नाही.
  4. मुंबई इंडियन्सला एका चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण रोहित शर्मा-इशान किशन पाठोपाठ बाद झाले. रोहित शर्माने आज चांगली सुरुवात केली होती. त्याने 17 चेंडूत 28 धावा करताना तीन चौकार, दोन षटकार लगावले होते. पण रबाडाच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा नेमका कुठल्या प्रकारचा फटका खेळताना बाद झाला ते समजलचं नाही.
  5. डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा या मुंबईच्या युवा फलंदाजांच कौतुक कराव लागेल. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 84 धावांची भागीदारी केली. ब्रेविसने 25 चेंडूत 49 धावा फटकावल्या.
  6. तिलक वर्मा आणि कायरन पोलार्ड यांच रनआऊट होणं महाग पडलं. कारण दोघेही सेट झाले होते. तिलक वर्माने 36 धावा केल्या होत्या. दोघेही धावबाद झाले नसते, तर कदाचित मुंबईने आज हा सामना जिंकला असता. कायरन पोलार्डच्या रनआऊट होण्यामध्ये त्याचीच चूक जास्त आहे. पोलार्डने वेगात धाव घेतली नाही. तीच चूक मुंबईला सर्वात जास्त महाग पडली.