मुंबई: IPL 2022 मध्ये आज क्रिकेट रसिकांना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (RR vs KKR) एक जबरदस्त सामना पहायला मिळाला. या सामन्यात अनेक चढ-उतार पहायला मिळाले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 217 अशी विशाल धावसंख्या उभारली. त्यामुळे राजस्थान हा सामना सहज जिंकेल, असा अनेकांचा कयास होता. पण श्रेयस अय्यरच्या केकेआरने तो चुकीचा ठरवला. एवढ्या मोठया धावसंख्येचा केकेआरने आक्रमक सुरुवातीने पाठलाग सुरु केला. सुनील नरेनची पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेली. पण त्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि एरॉन फिंचने डाव सावरला. फिंचने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 28 चेंडूत 58 धावा केल्या. यात 9 चौकार आणि दोन षटकार होते. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना त्याने करुण नायरकडे सोपा झेल दिला.
त्यानंतर श्रेयस अय्यरने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्याने तुफानी फलंदाजी सुरु ठेवली. राजस्थानच्या गोलंदाजांना अजिबात दाद दिली नाही. कुठलाही दबाव घेतला नाही. श्रेयस आज कॅप्टन इनिंग्स खेळला. तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकला असता, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. पण युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर तो मोक्याच्या क्षणी पायचीत झाला. श्रेयसने 51 चेंडूत 85 धावा करताना सात चौकार आणि चार षटकार लगावले. आंद्रे रसेल या केकेआरच्या धोकादायक फलंदाजाला अश्विनने आऊट केलं. अश्विनने टाकलेला चेंडूच रसेलला समजला नाही. तो शून्यावर आऊट झाला.
युजवेंद्र चहलने टाकलेलं 17 व षटक निर्णायक ठरलं. या ओव्हरने गेम फिरवला. चहलने या ओव्हरमध्ये चार विकेट घेत हॅट्ट्रिक घेतली. आधी त्याने षटकातील पहिल्याच चेंडूवर वेंकटेश अय्यरची संजू सॅमसनकरवी स्टम्पिंग केली. वेंकटेशन फक्त सहा धावा केल्या. चहलच्या गोलंदाजीवर स्टेपआऊट होणं केकेआरला महाग पडलं. चौथ्या चेंडूवर चहलने श्रेयस अय्यरला पायचीत केलं. पाचव्या चेंडूवर शिवम मावीला भोपळाही फोडू न देता रियान परागकरवी झेलबाद केलं. त्यानंतर पॅट कमिन्सला सॅमसनकरवी झेलबाद केलं. चहलने या सीजनमधली पहिली हॅट्ट्रिक घेतली. त्याने चार ओव्हर्समध्ये 40 धावा देत पाच विकेट घेतल्या.
One emoji to describe THAT win. ?? pic.twitter.com/7HCoMiGPlu
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 18, 2022
उमेश यादवने आज फटकेबाजी करुन रंगत आणली. त्याने 9 चेंडूत 21 धावा तडकावल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार होते. शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी 12 धावांची आवश्यकता होती. शेल्डन जॅक्सनने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या. दुसऱ्या चेंडूवर त्याने प्रसिद्ध कृष्णाकडे झेल दिला. त्यानंतर ओबेड मेकॉयने उमेश यादवला क्लीन बोल्ड केलं. तिथेच केकेआरचा खेळ संपला.