मुंबई: भारतात सर्वात लोकप्रिय खेळ कुठला? तर क्रिकेट. भारतात क्रिकेटचे (Cricket) कोट्यवधी चाहते आहेत. बरेच जण प्रत्यक्षात मैदानावर उतरुन कधी क्रिकेट खेळले नसतील, पण तोंडाने कॉमेंट्री करण्यात या चाहत्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. भारतात क्रिकेटबद्दलच्या भावना किती तीव्र आहेत, त्याची सर्व जगाला कल्पना आहे. विषय आयपीएलचा (IPL) असेल, तर हा रोमांच अधिक वाढतो. आयपीएलमधून बोर्ड, फ्रेंचायजी आणि खेळाडू सर्वच बक्कळ पैसा कमावतात. त्यामुळे आयपीएलच्या मीडिया राइट्स (IPL Media Rights) नेहमीच चर्चेचा विषय असतात. ब्रॉडकास्टिंग कंपन्यांना सुद्धा माहित असतं, आयपीएलमधून त्यांना किती नफा मिळू शकतो. त्यामुळे आयपीएलचे मीडिया राइट्स मिळवण्यासाठी या कंपन्या आपली सर्व ताकत पणाला लावतात. यंदा आयपीएलच्या मीडिया राइट्सचा लिलाव आहे. 12 जूनला ही लिलाव प्रक्रिया पार पडेल. आतापर्यंत मुख्य स्पर्धा डिजनी स्टार आणि सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या वाहिन्यांमध्ये होती. पण आता आणखी दोन दिग्गज कंपन्या या स्पर्धेमध्ये उतरल्या आहेत. अॅमेझॉन आणि वायकॉम 18 या त्या दोन कंपन्या आहेत.
अॅमेझॉनचे जेफ बेजोस आणि वायकॉमचे मुकेश अंबानी ही उद्योग क्षेत्रातील दोन मोठी नाव आहेत. त्यांच्यातील स्पर्धा देखील सर्वांना माहित आहे. आयपीएल मीडिया राइटसच्या इतिहासात प्रथमच टीवी अधिकार आणि लाइव स्ट्रीमिंग अधिकारासाठी वेगवेगळा लिलाव होईल. त्यामुळेच अॅमेझॉन या शर्यतीत उतरली आहे. अॅमेझॉन OTT प्लॅटफॉर्मचे राइट मिळवण्यासाठी आपली पूर्ण ताकत पणाला लावेल.
अंबानींची रिलायन्स इंडस्ट्री सुद्धा राइट्स मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावेल. अॅमेझॉन आणि रिलायन्स या दोन कंपन्या ई-कॉमर्सच्या क्षेत्रात परस्परासमोर आहेत. लिलाव जिंकणं हा प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यासाठी रिलायन्स आणि अॅमेझॉन आपली पूर्ण ताकत झोकून देतील, असं इनसाइड स्पोर्टने पॉकेट एसेसच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदिती श्रीवास्तव यांच्या हवाल्याने म्हटलं आहे.
अॅमेझॉन आणि वायकॉम या दोन कंपन्या आर्थिक दृष्ट्या जास्त सक्षम आहेत. त्यामुळे सध्या त्यांची नावं आघाडीवर आहेत. या दोघांना वॉल्ट डिजनीची स्टार इंडिया आणि लाइव स्ट्रीमिंग सर्विस डिजनी हॉटस्टार त्याशिवाय सोनी पिक्चर्सकडून आव्हान मिळेल.
भारतीय क्रिकेट बोर्ड या लिलावातून बक्कळ पैसा कमावणार आहे. याआधी 2018 ते 2022 साठी मीडिया राइट्स दिले होते. त्यातून 16 हजार कोटीपेक्षा जास्तची कमाई झाली होती. यावेळी 50 ते 60 हजार कोटीपर्यंत बीसीसीआय कमाई करु शकते.