TATA IPL 2022 Mega Auction चा आज दुसरा दिवस आहे. फ्रेंचायजींनी खेळाडूंवर बोली लावायला सुरुवात केली आहे. काल पहिल्यादिवशी एकूण 97 खेळाडूंवर बोली लागली. यात 74 खेळाडूंना विकत घेतलं. 23 खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. लिलावात विकत घेतलेल्या 74 खेळाडूंमध्ये 20 परदेशी खेळाडू होते. लिलावासाठी 600 खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामुळे आजही अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लागेल. कालच्या दिवसात इशान किशन, दीपक चाहर आणि श्रेयस अय्यर हे तिघे सर्वात महागडे खेळाडू ठरले होते. आज ऑक्शनला सुरुवात झाल्यानंतर दुसरंच नाव अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) पुकारलं गेले. अजिंक्य रहाणेचं ऑक्शनमध्ये काय होणार? त्याला कोणी खरेदीदार मिळणार का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले होते. मागच्या काही दिवसांपासून मीडियामध्ये अजिंक्य रहाणेबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. कारण दक्षिण आफ्रिका दौऱ्यात (South Africa Tour) फ्लॉप ठरल्यानंतर त्याचं करीयर संपलं अशी क्रिकेटच्या जाणकारांमध्ये चर्चा सुरु आहे.
अजिंक्यवर त्याच्या खेळावरुन बरीच टीका सुद्धा झाली आहे. आयपीएल ऑक्शनच्या दोन दिवसआधीच अजिंक्यने त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं. बॅकस्टेज विथ बोरीया कार्यक्रमात त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल एक मोठा खुलासाही केला. “मैदानावर मी निर्णय घेतले, पण त्याचं श्रेय कोणी दुसराचं घेऊन गेला” अशी खंत त्याने बोलून दाखवली होती.
आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये अजिंक्य रहाणेचं काय होणार? त्या प्रश्नाच आज उत्तर मिळालं. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला कोलकाता नाइट रायडर्सने विकत घेतलं. अजिंक्य रहाणेची बेस प्राइस 1 कोटी रुपये होती. त्याला त्याच किंमतीला विकत घेतलं. केकेआर वगळता अन्य कुठल्याही फ्रेंचायजीने रहाणेवर बोली लावण्यासाठी ऑक्शन पॅड उचललं नाही. त्याचा सध्याचा फॉर्म हेच त्यामागे कारण असावं. कारण अजिंक्यवर बोली न लावण्यामागे फ्रेंचायजींनी त्याच्या वयाचा सुद्धा विचार केला असेल.