मुंबई: IPL 2022 स्पर्धेच्या लीग स्टेजमधला शेवटचा सामना काल झाला. 26 मार्च पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत लीग स्टेजमध्ये एकूण 70 सामने खेळण्यात आले. काल रविवारी 22 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्समध्ये (SRH vs PBKS) लीग स्टेजचा शेवटचा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा शेवटचा सामना खेळण्यात आला. या मॅचमध्ये पंजाब किंग्सने सनरायजर्स हैदराबादवर 5 विकेट राखून विजय मिळवला. या विजयामुळे सीजनच्या फायनल पॉइंट्स टेबलमध्येही (Points Table) बदल दिसून आला. पंजाबच्या क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा झाली. ते सहाव्या स्थानावर पोहोचले. पण SRH च्या स्थानात कुठलाही बदल झाला नाही.
लीगमधला अखेरचा सामना फक्त औपचारिकता मात्र होता. त्याने प्लेऑफच्या समीकरणांमध्ये काहीही बदल होणार नव्हता. कारण दोन्ही संघ तीन दिवस आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले होते. या सामन्याचा उद्देश फक्त मोसमाचा शेवट गोड करणं आणि पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या टीम्सच्या पुढे निघून जाणं, इथपर्यंतच होता. संपूर्ण सीजनमध्ये हैदराबाद आणि पंजाबच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. हैदराबादने पहिले दोन सामने गमावल्यानंतर चांगली लय पकडली होती. मात्र नंतर लागोपाठ सामने त्यांनी गमावले. अखेरचा सामना संपल्यानंतर हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर राहिला.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
70 सामने पूर्ण झाले असून पॉइंट्स टेबलमध्ये टॉप फोरमध्ये गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे चार संघ आहेत. या चार टीम्समध्ये फक्त राजस्थान असा एकमेव संघ आहे, ज्यांनी विजेतेपद मिळवलं आहे. बँगलोरची टीम तीन वेळा फायनलमध्ये पोहोचली. पण एकदाही त्यांना विजेतेपद मिळवता आलं नाही. गुजरात आणि लखनौने या सीजनमध्ये डेब्यु केलाय. या चार टीम्समधून आयपीएलला नवीन विजेता मिळणार आहे.