मुंबई: वनडे मालिका विजयाने टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची (Team india England Tour) सांगता झाली. भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर (West indies Tour) जाणार आहे. 22 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीज सुरु होतेय. भारतीय संघ वेस्ट इंडिज मध्ये तीन वनडे (ODI) आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाने आपली क्षमता दाखवून दिली. तेच वेस्ट इंडिजला मायदेशात बांगलादेशकडून मार खावा लागला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ अधिक सर्तक झाला आहे. त्यांनी आपली ताकत वाढवण्यावर भर दिला आहे. वेस्ट इंडिज 6 फूट 7 इंच उंचीच्या एका खेळाडूला 13 सदस्यीय संघात स्थान दिलं आहे. टीम इंडियासाठी हा खेळाडू धोकादायक ठरु शकतो. कारण या खेळाडूला वेस्ट इंडिजने जेव्हा जेव्हा संधी दिलीय, तेव्हा त्याने भारताविरुद्ध उत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. वनडे फॉर्मेट मध्ये तो भारतीय संघासाठी जास्त धोकादायक आहे. या खेळाडूचं नाव आहे जेसन होल्डर.
अलीकडेच मायदेशात बांगलादेश विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजच्या संघाने सपाटून मार खाल्ला. बांगलादेशने वेस्ट इंडिजवर क्लीन स्वीप विजय मिळवला. बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिजने इतकं खराब प्रदर्शन केलं असेल, तर भारतीय संघ त्यांची काय हालत करु शकतो, त्याची कल्पना करा. बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिजच्या पराभवाचं एक कारण जेसन होल्डरही आहे. कारण होल्डरला संघात स्थान मिळालं नव्हतं.
वेस्ट इंडिजने बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी जेसन होल्डरला आराम दिला होता. पण टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारताने इंग्लंड विरुद्ध वनडे, टी 20 मध्ये सरस कामगिरी केली. त्याशिवाय होल्डरने भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केलीय. हेच होल्डरचा वेस्ट इंडिज संघात समावेश करण्यामागे एक कारण आहे. जेसन होल्डरने वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी भारताविरुद्धच केली आहे. त्याने 27 धावा देऊन 5 विकेट काढल्या होत्या.
जेसन होल्डर भारताविरुद्ध 25 वनडे सामना खेळला आहे. त्यात त्याने 23 विकेट काढताना 450 धावा केल्या आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अहमदाबादमध्ये तो भारताविरुद्ध शेवटची वनडे मॅच खेळला होता. त्यात त्याने 34 धावा देऊन 4 विकेट काढल्या होत्या. भारताविरुद्ध त्याने नेहमीच सरस प्रदर्शन केलं आहे. त्यामुळेच तो भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो.
वेस्ट इंडिजच्या संघात कॅप्टन निकोलस पूरनशिवाय अनेक मोठे खेळाडू आहेत. भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळणार आहे. 22,24 आणि 27 जुलै असे तीन दिवस हे वनडे सामने होतील.
निकोलस पूरन (कॅप्टन), काइल मायर्स, जेसन होल्डर, ब्रँडन किंग, रोव्हमॅन पॉवेल, शे होप, शमरा ब्रुक्स, केसी कार्टी, अकील हुसैन, अल्जारी जोसफ, गुडाकेश मोटी, कीमो पॉल, जायडेन सील्स