मुंबई: टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 मॅचआधी टीम इंडियाला झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळालेली नाही. कॅप्टन रोहित शर्माने आज प्लेइंग 11 ची घोषणा केली. त्या टीममध्ये जसप्रीत बुमहारच नाव नव्हतं.
रोहित शर्माने काय सांगितलं?
जसप्रीत बुमराहला पाठदुखीचा त्रास जाणवतोय. त्यामुळे तो पहिला टी 20 सामना खेळत नाहीय, असं रोहित शर्माने सांगितलं. बुमराहने मंगळवारी प्रॅक्टिस सेशन दरम्यान पाठदुखीचा त्रास होत असल्याचं सांगितलं.
जसप्रीत बुमराहने पाठदुखीचा त्रास होत असल्याचं सांगितल्यानंतर बीसीसीआयच्या मेडीकल टीमने तपासणी केली. खबरदारी म्हणून जसप्रीत बुमराहला पहिल्या टी 20 आधी विश्रांती दिलीय.
मोठा चिंतेचा विषय
जसप्रीत बुमराहची पाठदुखी टीम इंडियासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. अलीकडेच दीपक हुड्डालाही पाठदुखीचा त्रास होतोय. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकला आहे.
बुमराहला सर्वात आधी कधी त्रास सुरु झाला?
जसप्रीत बुमराहला सर्वप्रथम इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरीज दरम्यान पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे तो दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर बुमराह आणि हर्षल पटेलचा टीममध्ये समावेश करण्यात आला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये पहिल्या सामन्यात बुमराह खेळला नाही. नंतरच्या दोन सामन्यात त्याला संधी मिळाली. आता पुन्हा एकदा त्याने पाठदुखीची तक्रार केल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे.