मुंबई: जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. सध्या सुरु असलेल्या आशिया चषक (Asia cup) स्पर्धेत तो खेळत नाहीय. दुखापतीमुळे त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. जसप्रीत बुमराह आठवडाभर बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. जसप्रीत बुमराह पाठदुखीने त्रस्त आहे. याआधी सुद्धा बुमराहला पाठदुखीमुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. हा त्याचा जुना त्रास आहे. पुन्हा एकदा पाठदुखीचा त्रास सुरु झाल्याने तो आशिया चषक स्पर्धेला मुकला. जसप्रीत बुमराह आठवडाभर NCA मध्ये होता. तो आता दुखापतीमधून सावरतोय. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रगती झाल्याची माहिती आहे. जसप्रीत बुमराह आता मुंबईतील घरी परतला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपआधी जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट होईल, याबद्दल एनसीए मधील फिजियो आणि बीसीसीआय आशावादी आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत जसप्रीत बुमराह कमबॅक करेल, अशी अपेक्षा आहे.
जसप्रीत बुमराहचं लवकरात लवकर फिट होणं, टीम इंडियासाठी आवश्यक आहे. कारण तो टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचं प्रमुख अस्त्र आहे. जसप्रीत बुमराहकडे भरवशाचा गोलंदाज म्हणून पाहिलं जातं. धावा रोखण्याबरोबरच संघाला गरज असताना विकेट मिळवून देणं, ही त्याची खासियत आहे. भारताने आतापर्यंत अनेक सामने जसप्रीत बुमराहच्या बळावर जिंकले आहेत. सुरुवातीच्या षटकात आणि डेथ ओव्हर्समध्ये जसप्रीत बुमराह जास्त प्रभावी आहे. त्याच्या परफेक्ट यॉर्करना तोड नाहीय. टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न साकार करण्यासाठी असा गोलंदाज संघात असणं, खूप आवश्यक आहे.
“रिकव्हरी मध्ये जसप्रीत बुमराहने चांगली प्रगती केलीय. आम्ही सातत्याने NCA फिजियोच्या संपर्कात आहोत. बुमराह एनसीए मध्ये नसला, तरी नितीन पटेल त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो कमबॅक करेल, अशी अपेक्षा आहे. पण आताच काही बोलणं, घाईच ठरेल” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं.