ENG vs NZ : इंग्लंडचा स्टार क्रिकेटर जो रुट एक अनुभवी, समजदार खेळाडू आहे. त्याच्याकडून बाळबोध चुकीची अजिबात अपेक्षा नसते. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये जो रुटच बाद होणं चर्चेचा विषय बनलय. रुट ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून सगळेच हैराण झालेत. टेस्ट मॅचच्या पहिल्या डावात शॉट्समध्ये एक्सपेरिमेंट करणं त्याला आणि टीमला चांगलच महाग पडलं. त्याने आपला विकेट गमावला. इंग्लंडच्या माजी कॅप्टनने जो शॉट खेळला, त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय.
माउंट माउंगानुई येथे इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. इंग्लंडची टीम प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. त्यांनी चांगली सुरुवात केली होती. जो रुट क्रीजवर होता. तो मोठी इनिंग खेळेल, अशी अपेक्षा होती. पण जो रुट त्याच्या चुकीमुळे बाद झाला.
पहिल्यांदाच असा फटका खेळताना आऊट
28 व्या ओव्हरमध्ये नील वेंगनर बॉलिंग करण्यासाठी आला. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर रुटने रिव्हर्स स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागला. रुटची फटका खेळण्याची शैली पाहून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या मिचेलला चेंडू त्याच्या दिशेने येणार हे समजलं. तो आधीपासूनच तयारीत होता. त्याने डाइव्ह मारुन कॅच घेतली. रुटला जसा शॉट मारायचा होता, तसा तो खेळू शकला नाही.
त्याने याआधी सुद्धा अनेकदा असा शॉट मारला आहे. पण पहिल्यांदाच तो असा फटका खेळताना बाद झाला. 22 चेंडूत 14 धावा करुन रुट पॅव्हेलियनमध्ये परतला.
आधी सुद्धा रुट रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला
याआधी रुटने वेंगनरच्या चेंडूवर अशा प्रकारचा शॉट मारला होता. नील वेगनरने 24 व्या ओव्हरचा तिसरा चेंडू यॉर्कर लेंथ टाकला. रुट फिरला व शानदार स्वीप शॉट मारला. टीम इंडियाचा सूर्यकुमार यादव खेळतो, तसा हा फटका होता. हा शॉट पाहून वेंगनर हैराण झाला. चेंडू बाऊंड्री पार गेला. इंग्लंडला चार रन्स मिळाले. दुसऱ्यांदा रुटने असाच प्रयत्न केला. पण त्यात तो यशस्वी झाला नाही. त्याला आपली विकेट गमवावी लागली.