टीम इंडियाने मागच्या शनिवारी T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळची मनोवस्था शब्दात मांडण खूप कठीण आहे. इतका आनंद झालेला की, आहे त्या जागी चार उड्या मारल्या. पण हा आनंद साजरा करण्यासाठी अजून चार लोक सोबत हवे होते असं वाटलं. 2011 वर्ल्ड कप विजयाच्या आठवणी ताज्या झाल्या. धोनीच्या सिक्सनंतर कॉलेजच्या जिवलग मित्रांसोबत उड्या मारताना चहाची टपरी तोडल्याच आठवण ताजी झाली. फायनल म्हटल्यावर टेन्शन येतच. म्हणून मी पूर्ण फायनलचा सामना पाहिला नाही. अधून-मधून स्कोर फक्त चेक करत होतो. 30 चेंडूत विजयासाठी 30 धावा अशी स्थिती झाल्यानंतर आता काय होणार नाही, म्हणून सामना पहायला सुरुवात केली, आणि चमत्कार घडला. बुमराह, अर्शदीप, सूर्या आणि हार्दिकने अक्षरक्ष: दक्षिण आफ्रिकेच्या तोंडात गेलेला विजयाचा घास हिरावून आणला.
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी कधी परतणार? मुंबईत विजयी मिरवणूक निघणार का? सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांना पडणारे प्रश्न माझ्याही मनात होते. बार्बाडोसमध्ये आलेल्या हरिकेन बेरिलने ही प्रतिक्षा थोंडी लांबवली. अखेर बुधवारी संध्याकाळी बीसीसीआयने विजयी मिरवणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर तिथे कसं पोहोचायत हेच प्लानिंग सुरु झालं. संध्याकाळी 5 ची वेळ आणि मॉर्निंग शिफ्टमुळे अडजेस्टमेंटचा प्रश्न नव्हता. माझ्यासारखाच एक हौशी मित्र गौरव तारेचा फोन आला. आमच ठरलं, टीम इंडियाला वेलकम करायला जायचं. तो खास पनवेलवरुन आला.
फक्त एक झलक पाहण्यासाठी तासना तास थांबले
संध्याकाळी 4 वाजता आम्ही आमच्या लोअर परेलच्या कार्यालयातून निघालो. पाच वाजता एअर इंडिया बिल्डिंगजवळ पोहोचलो. ट्रायडंट हॉटेल जवळ रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी जमली होती. टीम इंडियाची जर्सी घातलेले फॅन्स, हातात तिरंगे झेंडे घेऊन फोटो काढणारे उत्साही क्रिकेट प्रेमी दिसले. आपल्या लाडक्या टीम इंडियाला कधी पाहतोय, असं त्यांना झालं होतं. मुंबईत मरीन ड्राइव्ह ते चर्चगेट परिसरात जनसागर उसळलेला. या गर्दीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून बापरे किती ती गर्दी असे शब्द पहिले बाहेर पडतात. अरबी सागराच्या शेजारी आपल्या लाडक्या टीम इंडियाच कौतुक करण्यासाठी हे सर्व लोक जमले होते. आपल्या लाडक्या क्रिकेटपटुंची एक झलक पाहण्यासाठी अनेक लोक सकाळपासून आले होते. तासन तास त्या गर्दीचा भाग होऊन तिथे थांबले होते. संध्याकाळच्या वेळी ही गर्दी इतकी वाढली की, मुंगीलाही आत शिरायला वाव नव्हता. आपल्या विश्वविजेत्या टीमच कौतुक करण्यासाठी पालघर, डहाणू, पनवेल इथून लोक आले होते. चर्चगेट-मरीन ड्राइव्ह परिसरात अनेक सरकारी, खासगी कार्यालय आहेत.
‘गणपती बाप्पा मोरया’
कामावरुन निघाल्यानंतर या नोकरदार वर्गाचे पाय रेल्वे स्टेशनऐवजी आपसूकच ट्रायडंट हॉटेल, मरीन ड्राइव्हकडे वळले. कारण दिल्लीवरुन आल्यानंतर टीम इंडियाची विजयी मिरवणूक याच ट्रायडंट हॉटेलजवळून सुरु झाली. उपस्थित गर्दीमधून ‘भारत माता की जय’, ‘गणपती बाप्पा मोरया’ हे नारे ऐकू येत होते. आपल्या लाडक्या विश्वविजेत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी अनेक लोक चार-पाच तासापासून थांबून होते. यात फक्त तरुण-तरुणी नव्हते, तर पालकांसोबत आलेली लहान मुलं, गृहिणी, वयोवृद्ध महिला, पुरुष सगळेच आले होते.
‘मुंबईचा राजा, रोहित दादा’
टीम इंडियाची विजयी मिरवणूक संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार असं सांगितलेलं. पण नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने ही मिरवणूक सुरु झाली. पण म्हणून उपस्थित गर्दी अजिबात नाराज झाली नाही. उलट त्यांच्यामध्ये तोच जोश शेवटपर्यंत होता. ‘मुंबईचा राजा, रोहित दादा’ अशा घोषणा या गर्दीमधून देण्यात येत होत्या.
हीच माणसुकी त्या गर्दीमध्ये दिसून आली
लाखो लोक मरीन ड्राइव्ह परिसरात जमा झालेले होते. ही गर्दी पाहिल्यानंतर कोणी त्यात शिरण्याच धाडसही करणार नाही. लांबूनच काय तो आनंद घेऊ अशी अनेकांची प्रतिक्रिया असेल. एवढी प्रचंड गर्दी असूनही त्यात एक शिस्त दिसत होती. मुंगी शिरायलाही वाव नाही असं वाटत असतानाच सायरन वाजत आलेल्या एका रुग्णवाहिकेसाठी लोकांनी झटपट बाजूला होऊन वाट करुन दिली. मुंबईकर हे उत्साह, स्पिरिट बरोबर माणुसकीसाठी सुद्धा ओळखले जातात. हीच माणसुकी त्या गर्दीमध्ये दिसून आली. काल एक पत्रकार म्हणून मरीन ड्राइव्ह ते ट्रायडंट हॉटेलच्या रस्त्यावर मी जे पाहिजे, अनुभवलं ते क्षण पुन्हा कधी येणार? हाच प्रश्न आता माझ्या मनात आहे.