मुंबई: कपिल देव (Kapil dev) यांना कोण ओळखत नाही?. क्रिकेटच्या मैदानात त्यांनी अनेक रेकॉर्ड केले आहेत. 1983 साली त्यांच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) पहिल्यांदा वर्ल्ड कप (World cup) जिंकला. क्रिकेट विश्वातील दिग्गज ऑलराऊंडर्समध्ये कपिल देव यांचा समावेश होतो. आपल्या वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. असच एक वक्तव्य कपिल यांनी प्रेशर आणि डिप्रेशन बद्दल केलं आहे. या विधानाबद्दल सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका सुद्धा होतेय.
कपिल यांच्या विधानावर सायनाचं हसू
कपिल देव अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी तिथे प्रेशर म्हणजे खेळण्याच्या दबावाला डिप्रेशनशी जोडलं. एवढच नाही, डिप्रेशन हा अमेरिकी शब्द असल्याचं कपिल म्हणाले. काही यूजर्सना कपिल यांचं हे मत पटलं नाही. त्यांनी कपिल देव यांच्यावर जोरदार टीका केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये कपिल यांच्यासोबत स्टार शटलर सायना नेहवाल सुद्धा दिसतेय. कपिल बोलत असताना सायना हसताना दिसतेय.
डिप्रेशन अमेरिकी शब्द
“टीव्हीवर आजकाल मी ऐकत असतो, भरपूर प्रेशर आहे. आयपीएलमध्ये खेळतात. भरपूर दबाव असतो. मी फक्त एकच सांगीन ‘नका खेळू’. हे प्रेशर काय असतं? तुमच्यात आवड, इर्ष्या आहे, मग दबाव असू शकत नाही. हे प्रेशर आणि डिप्रेशन अमेरिकी शब्द आहेत. मला समजत नाही. मी शेतकरी कुटुंबातून येतो. आम्ही आनंदासाठी खेळतो. जिथे तुम्हाला मजा येते, तिथे दबाव असू शकत नाही” असं कपिल देव त्या व्हिडिओमध्ये म्हणाले.
So disappointing to see a legend like Kapil Dev mocking depression in such a cavalier and crude manner.
I want to know what his frame of mind was when he broke into tears on Karan Thapar’s show following match-fixing allegations against him? #KapilDev pic.twitter.com/N6QQmsLEq5
— Navneet Mundhra (@navneet_mundhra) October 9, 2022
सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
कपिल देव यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही लोक कपिल देव यांच्यावर टीका सुद्धा करतायत. खेळातील दबाव, डिप्रेशनवर याआधी फार चर्चा नाही व्हायची. कोविड 19 नंतर यावर भरपूर मोकळेपणाने बोललं जातय. मागच्या काही वर्षात अनेक खेळाडूंनी मानसिक दबाव असल्याच मान्य केलय.
यात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सुद्धा आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि बेन स्टोक्स या क्रिकेटपटूंनी याच कारणामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. काही जण या विधानाबद्दल कपिल देव यांच्यावर टीका करतायत, तर काहींनी त्यांच समर्थन सुद्धा केलय.