India vs England : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या जागतिक क्रिकेटमधीव अव्वल कर्णधार मानला जातो. क्रिकेट जगतात त्याची गणना एक सर्वोत्तम कर्णधार म्हणून होते. त्याचे रेकॉर्ड्स त्याची साक्ष देतात. कसोटी क्रिकेट माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, असं खुद्द कोहली म्हणतो. तसंच कसोटी फॉरमॅटमध्ये कोहलीचा जोश आणि उत्साह वाखण्यासारखा असतो. इंग्लंडचा माजी कर्णधार तथा दिग्गज खेळाडू केवीन पिटरसनने (Kevin Pietersen) विराटला सॅल्यूट ठोकत त्याचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
“विराट कोहली एक महान कर्णधार आहे. कसोटी क्रिकेट खेळताना त्याचा उत्साह आणि संघ सहकाऱ्यांना असलेला सपोर्ट त्याला तोड नसते. कसोटी क्रिकेट खेळताना त्याची बॉडी लँग्वेज आणि त्याचं वागणंच सांगतं की त्याच्यासाठी कसोटी क्रिकेट सगळं काही आहे”, अशी स्तुतीसुमने पीटरसनने विराटवर उधळली.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये आपले स्थान निर्माण करणारा कोहली भलेही काही काळासाठी चांगल्या फॉर्ममध्ये नसेल, पण तरीही त्याचं कसोटी फॉरमॅटवर मनापासून प्रेम असल्याचं अनेकदा दिसून येते. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि तो सातत्याने धावा करत आहे. साहजिकच, अशा स्थितीत त्याची गणना अव्वल खेळाडूंमध्ये होते आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करतो, असं पीटरसन म्हणाला.
पीटरसन म्हणाला की, विराट स्वतः सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांच्या पावलावर पाऊल टाकतोय… सचिन आणि द्रविड महान कसोटी क्रिकेटपटू आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये मोठी उंची गाठलीय. त्याने ‘बेटवे’ साठी त्याच्या ब्लॉगमध्ये लिहिले, “मी विराट कोहलीला जितके ओळखतो, मला माहित आहे की त्याने आपल्या आयडॉलला फॉलो करण्यासाठी किती मेहनत घेतली आहे. कोहलीला माहित आहे की खेळातला लिजेंड बनण्यासाठी त्याला टी -20 बरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. म्हणूनच तो या फॉरमॅटला खूप महत्त्व देतो”
हे ही वाचा :
भारताकडून लॉर्ड्सवर पराभव, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने टीम सोडली, आता या स्पर्धेत खेळणार!
एकदिवसीय क्रिकेटमधील 13 वर्षांच्या कारकिर्दीत सचिन-विराटमध्ये कोण वरचढ?, पाहा आकडेवारी