मुंबई: क्रिकेटचा फॉर्मेट जितका छोटा, कायरन पोलार्ड (kieron pollard) तितकाच धोकादायक खेळाडू. पोलार्डच वय वाढत चाललय, पण त्याच्या फलंदाजीची धार अजून कमी झालेली नाही. जगातील जवळपास प्रत्येक लीग मध्ये या खेळाडूने आपली छाप उमटवलीय. सर्वात ताजं उदहारण म्हणजे इंग्लंड (England) मध्ये सुरु असलेल्या ‘द हण्ड्रेड’ (The Hundread) स्पर्धेच. 100 चेंडूंच्या या स्पर्धेत पोलार्डची धुवाधार बॅटिंग पहायला मिळतेय. तो अक्षरक्ष: धावांचा पाऊस पाडतोय. गोलंदाजी फोडून काढताना चौकार-षटकारांचा पाऊस पाडतोय. त्याच्या स्ट्राइक रेट मधूनच त्याची कल्पना येते. आता त्याला बाद करणं सुद्धा अवघड झालय.
मँचेस्टर ओरिजनल्स विरुद्ध लंडन स्पीरिटच्या विजयात कायरन पोलार्डची पावरफुल इनिंग महत्त्वपूर्ण ठरली. द हण्ड्रेड मध्ये पोलार्ड या सीजन मधला दुसरा सामना खेळत होता. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लंडन स्पीरिटसाठी पोलार्डने दुसऱ्या सामन्यात नाबाद आणि स्फोटक इनिंग खेळला.
पोलार्ड लंडन स्पीरिटसाठी खेळताना सलग दुसऱ्यासामन्यात नाबाद राहिला. मँचेस्टर ओरिजनल्स विरुद्ध तो फक्त 11 चेंडू खेळला. पण त्या मध्ये त्याने 4 षटकार आणि 1 चौकार ठोकला. त्याने नाबाद 34 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 309 पेक्षा पण जास्त होता.
पोलार्डच्या इनिंगमुळे लंडन स्पीरिट टीमने 100 चेंडूत 160 धावा केल्या. मँचेस्टर ओरिजनल्सची टीम या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अयशस्वी ठरली. संपूर्ण टीम 98 चेंडूत 108 धावात ऑलआऊट झाली. 52 धावांनी त्यांनी हा सामना गमावला.
याआधी सुद्धा द हण्ड्रेड च्या पहिल्या सामन्यात पोलार्ड 13 चेंडूत 19 धावा काढून नाबाद होता. त्यावेळी त्याने 1 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. पोलार्डची इनिंग तुम्हाला छोटी वाटेल, तो कमी चेंडू खेळतोय. पण त्यांची इनिंग परिणामकारक ठरतेय. पोलार्ड द हण्ड्रेडच्या चालू सीजनमध्ये आतापर्यंत नॉटआउट आहे. या दरम्यान त्याने 220 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 24 चेंडूत 53 धावांच्या दोन इनिंग्स खेळल्या आहेत. यात पाच षटकार आणि दोन चौकार आहेत.