मुंबई: तिरुवनंतपुरमच्या कठीण पीचवर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 8 विकेट राखून हरवलं. ग्रीनफिल्ड स्टेडियमच्या पीचवर गोलंदाजांचा बोलबोला होता. फलंदाजांसाठी इथे धावा बनवणं कठीण होतं. या पीचवर केएल राहुल नाबाद अर्धशतकी इनिंग खेळला. टीम इंडियाच्या विजयात ही इनिंग महत्त्वपूर्ण ठरली.
राहुलच्या नावावर एक रेकॉर्ड
टीमला विजय मिळवून देण्याच्या नादात राहुलने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. टी 20 क्रिकेटमध्ये कुठल्याही फलंदाजाला असा रेकॉर्ड आपल्या नावावर नको असेल.
सर्वात धीमं अर्धशतक
केएल राहुल कालच्या मॅचमध्ये नाबाद होता. तबरेज शम्सी 17 वी ओव्हर टाकत होता. त्याच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारुन राहुलने टीमला विजय मिळवून दिला. राहुलने या मॅचमध्ये 56 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. दोन चौकार आणि चार षटकार ठोकले.
राहुलने काल अर्धशतक झळकावलं. पण टी 20 मध्ये कसोटीचा दर्जा प्राप्त असलेल्या टीमच्या खेळाडूने झळकवलेलं हे सर्वात धीमं अर्धशतक आहे.
लक्ष्य सोपं वाटत होतं
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. फलंदाजीसाठी विकेट कठीण होती. दक्षिण आफ्रिकेला फक्त 106 धावांवर रोखलं. टी 20 क्रिकेटच्या दृष्टीने लक्ष्य सोपं वाटत होतं. पण खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल होती. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली झटपट तंबूत परतले.
जबाबदारी चोखपणे पार पडली
त्यानंतर केएल राहुलवर जबाबदारी येऊन पडली. त्याने सूर्यकुमार यादवसोबत मिळून ती जबाबदारी चोखपणे बजावली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 93 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने आधी आक्रमक फलंदाजी केली. त्यावेळी राहुल संभाळून खेळत होता. नंतर त्याने सुद्धा आपल्या फलंदाजीचा गियर बदलला व जोरदार फटकेबाजी केली.