डरहम : भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये काउंटी XI (County Select XI) संघासोबत सराव सामना खेळत आहे. इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून कसोटी मालिका खेळण्यापूर्वी सराव होण्याकरीता हा सामना खेळवला जात आहे. यावेळी दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे महत्त्वाचे फलंदाज सामन्यात नसल्याने भारताची सुरुवातीची फळी फेल होताना दिसत होती. पण त्याचवेळेस बदली यष्टीरक्षक म्हणून आलेल्या केएल राहुलने (KL Rahul) अप्रतिम शतक ठोकत सामन्यात भारताला एक चांगली आघाडी मिळवून दिली आहे.
राहुलने 149 चेंडूत 11 चौकार आणि एक षटकार ठोकत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले 15 वे शतक ठोकले. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची (Team India) 67 धावांवर तीन बाद अशी परिस्थिती झाली असताना राहुल मैदानात आला. रवींद्र जाडेजासोबत मिळून शतकी भागिदारी करत राहुलने आपले शतक पूर्ण केले. कठीण वेळेत संयमी खेळी करत राहुलने केलेले हे शतक भारताला पहिल्या दिवशी एक चांगली आघाडी मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरले.
भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंतची (Rishabh Pant) विकेटकीपर म्हणून जागा निश्चित झाली होती. पण नुकतीच त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो विश्रांती करत असून दुसरा यष्टीरक्षक रिद्धिमान साहा (Wridhiman Saha) हाही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने विलगीकरणात आहे. त्यामुळे तिसरा पर्याय असणाऱ्या राहुलला या सराव सामन्यात संधी देण्यात आली.
केएल राहुल मार्च, 2020 मध्ये शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. कर्नाटक संघाकडून तो रणजी ट्रॉफीमध्ये हा सामना खेळला होता. तर भारतीय संघाचा विचार करता राहुलला सप्टेंबर, 2019 मध्ये वेस्ट इंडीजच्या दौऱ्यात संघात जागा मिळाली होती. पण त्यानंतर खराब फॉर्ममुळे तो कसोटी संघातून बाहेर गेला होता. मात्र या धमाकेदार कामगिरीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात पुन्हा स्थान मिळू शकते. याचे कारण सलामीवीर शुभमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे राहुलला एक सलामीवीर म्हणून संघात जागा मिळू शकते.
राहुलने आतापर्यंत टीम इंडियाकडून 36 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 34.58 च्या सरासरीने 2 हजार 6 रन्स करत 5 शतक आणि 11 अर्धशतक ठोकले आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 78 सामन्यात 46.04 च्या सरासरीने 5 हजार 802 रन्स केले आहेत.
हे ही वाचा
IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन
(KL rahul hits Century in India vs Count xi Practice test match at durham)