मुंबई : आयपीएल टीमने रिटेन केलेल्या खेळाडुंची यादी काही वेळातच जाहीर होणार आहे. त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये जाणार याची उत्सुक्ता सर्वांना लागली आहे. मात्र (IPL) आयपीएल 2022 मध्ये काही खेळाडुंवर नियम मोडल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. आयपीएलचे नियमभंग केल्याप्रकरणी या खेळाडुंवर कारवाई होऊ शकते. यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्जमधील (Panjab) काही खेळाडुंचा समावेश असण्याची शक्यता आहे. आयपीएलचे नियम मोडल्याप्रकरणी याआधीही रविंद्र जडेजावर बॅन लागला होता.
के. एल. राहुल, राशीद खानवर कारवाई?
भारताचा सलामीवीर आणि पंजाब टीमचा कर्णधार के. एल. राहुल आणि फलंदाजांना धडकी भरवणारा सनरायझर्स हैदराबादचा स्पिनर राशीद खान यांना नव्या येणाऱ्या टीमनी जास्त पैशांची ऑफर करुन त्यांच्या टीममध्ये सामील होण्यासाठी गळ लावल्याच्या चर्चा आहेत. तसेच बीसीसीआयला याबाबत तक्रार करण्यात आली आहे.
आयपीएलचे नियम काय सांगतात
आयपीएलच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडुला लिलावाआधी पैशाबाबत इतर टीमशी चर्चा, मोलभाव करता येत नाही, असे केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणात दंड किंवा बॅन अशी दोन्ही प्रकारची कारवाई खेळाडूंवर केली जाऊ शकते. के. एल. राहुल किंवा राशीद खानकडून मात्र याबाबत अधिकृतरित्या बाजू समोर आली नाही.
याआधी रविंद्र जडेजावर बॅन
भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि आता चेन्नईकडून आयपीएल गाजवत असलेला रविंद्र जडेजा याच्यावर याआधी अशी कारवाई झाली आहे. 2010 मध्ये मुंबई इंडियन्सशी पैशाबाबत मोलभाव केल्याचा ठपका ठेवत रविंद्र जडेजावर एक सीझन बॅनची कारवाई करण्यात आली होती. याबाबत बीसीसीआय अधिकृतरित्या काय भूमिका घेईल हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.