मुंबई: लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन KL Rahul च्या फलंदाजीच्या टेक्निकचे बरेच चाहते आहेत. कसोटी असो, वा वनडे किंवा T 20 केएल राहुल धावांच्या राशी उभारतो. आयपीएलच्या प्रत्येक सीजनमध्ये केएल राहुलने खोऱ्याने धावा केल्या आहेत. प्रत्येक सीजनमध्ये राहुलने 600 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या सीजनमध्येही राहुलने अशीच फलंदाजी केली. त्याने 15 डावात 50 पेक्षा जास्त सरासरीने 616 धावा केल्या. मात्र तरीही लखनौ सुपर जायंट्सची (Lucknow super Giants) टीम फायनलमध्ये पोहोचू शकली नाही. काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने लखनौकडून सर्वाधिक 78 धावा ठोकल्या. पण तरीही त्याच्यावरच टीका होतेय. माजी क्रिकेटपटू संजय मांजेरकर (Sanjay Manjrekar) यांनी केएल राहुलच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.
“पंजाब किंग्ससाठी खेळताना पण केएल राहुलची हीच पद्धत होती. केएल राहुल खेळपट्टीवर जास्तवेळ टिकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. तो खेळपट्टिवर पाय रोवून उभ रहाण्याचा प्रयत्न करतो. पण मी कोच असतो, तर मी त्याला वेगळ्या पद्धतीने खेळायला सांगेन. माझ्या मते खेळपट्टीवर जास्तवेळ टिकण्यापेक्षा त्याने जास्त वेगाने धाव करणं आवश्यक आहे. केएल राहुल वेगाने धावा बनवतो, तेव्हा संघाला जास्त फायदा होतो, हे आपण पाहिलं आहे” असं संजय मांजरेकर ईएसपीएन क्रिकइंफोनशी बोलताना म्हणाले.
केएल राहुलचं धीम्यागतीने खेळणं, लखनौच्या पराभवाचं एक कारण आहे. राहुल 58 चेंडूत 79 धावांची इनिंग खेळला. पण 200 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ही तशी धीमी इनिंग आहे. महत्त्वाचं म्हणजे राहुल स्वत:च अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 43 चेंडू खेळला. त्याशिवाय लखनौच्या डावात 43 चेंडू असे होते, ज्यावर धावाच निघाल्या नाहीत. केएल राहुलने शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यासाठी जो वेग आवश्यक होता, तो त्याला पकडता आला नाही.