चेन्नई: टीम इंडियासाठी 2022 हे वर्ष संमिश्र ठरलं. द्विपक्षीय सीरीजमध्ये टीम इंडियाला बऱ्यापैकी यश मिळालं. पण टी 20 वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली काही खेळाडूंना टीममध्ये वारंवार संधी मिळाली. सातत्याने त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. पण तरीही टीममधील त्यांच्या स्थानाला धक्का लागला नाही. टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने अशाच एका खेळाडूबद्दल परखड भाष्य केलं आहे. टीममधील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय.
परफॉर्मन्सवर सातत्याने प्रश्नचिन्ह
केएल राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. पण त्याच्या परफॉर्मन्सवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय. केएल राहुलला स्वत:लाही या वर्षातील त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी लक्षात ठेवायला आवडणार नाही. आठ इनिंगमध्ये त्याने फक्त 137 धावा केल्या. यात फक्त एक अर्धशतक आहे. बांग्लादेश विरुद्ध दोन कसोटी सामन्यातही राहुल प्रभावी कामगिरी करु शकला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2-0 ने ही सीरीज जिंकली. पण त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय. राहुलच्या टीकाकारांमध्ये दिनेश कार्तिकही आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज ही संधी
कसोटी क्रिकेटमधील राहुलच्या सुमार कामगिरीवर त्याने बोट ठेवलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सीरीजमध्ये राहुलला कामगिरीत सुधारणा करावी लागेल, असा सल्ला देखील दिलाय. 40 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळूनही राहुलची सरासरी 30 च्या आसपास असल्याच त्याने सांगितलं. भारतीय कसोटी क्रिकेटमधील ही सर्वात कमी सरासरी आहे. दिनेश कार्तिक क्रीकबझशी बोलत होता.
अशी सरासरी अजिबात मान्य नाही
“मी केएल राहुलला अजून दोन कसोटी सामन्यात संधी देईन. पण तरीही कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर एक गोष्ट त्याच्या विरोधात जाते. तो 40 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलाय. त्याची सरासरी फक्त 30 च्या घरात आहे. ओपनरसाठी अशी सरासरी अजिबात मान्य नाही. भारतीय क्रिकेटर्समधील ही सर्वात कमी सरासरी आहे” असं कार्तिक म्हणाला.
….तर शुभमन गिलला जागा करुन दे
3 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत केएल राहुलने धावा केल्या नाहीत, तर त्याने कायमस्वरुपी शुभमन गिलला जागा करुन द्यावी असं कार्तिकच मत आहे.