मुंबई: श्रीलंका-बांगलादेश कसोटी (SL vs BAN TEST) सामना सुरु असताना अचानक एका श्रीलंकन खेळाडूच्या छातीत दु:खू लागलं. त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं आहे. कुशल मेंडिस (Kusal Mendis chest pain) असं या खेळाडूचं नाव आहे. श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये मीरपूर (Mirpur) येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. आज या कसोटीचा पहिला दिवस आहे. कुशल मेंडिस मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना, अचानक त्याच्या छातीत वेदना सुरु झाल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. अचानक घडलेल्या या प्रकाराने मैदानावरील प्रेक्षकांसह खेळाडू सर्वचजण चिंतेत आहेत. कुशल मेडिंसच्या प्रकृतीला आराम पडावा, अशीच सर्वजण प्रार्थन करत आहेत.
कुशल मेंडिसच्या छातीत कळा सुरु झाल्यानंतर टीमचे फिजियो लगेच धावत मैदानात आले. त्यांनी तातडीचे उपचार केले. पण त्याची हालत जास्त खराब झाली, तेव्हा मेंडिसला मैदानाबाहेर नेलं. मैदानाबाहेर जाताना कुशल मेंडिसचा छातीवर हात होता. त्याला होणाऱ्या वेदना जाणवत होत्या.
कुशल मेंडिस याला ढाक्यातील रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तिथे त्याचा चेकअप सुरु आहे. बांगलादेशच्या डावात 23 व्या षटकात ही घटना घडली. कुशल मेंडिस स्लीपमध्ये फिल्डिंग करत होता. तेव्हा अचानक त्याच्या छातीत वेदना सुरु झाल्या.
Kusal Mendis left field holding his chest and has been hospitalized in Dhaka,this is scary hope he’s ok#BANvsSL pic.twitter.com/BZLjoZuX7s
— Robin Saroy (@RobinSaroy2002) May 23, 2022
कुशल मेंडिसची जी स्थिती होती, त्यानुसार त्याला तात्काळ रुग्णालयात नेणं आवश्यक होतं, असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर मंजूर हुसैन यांनी सांगितलं. सामन्याच्याआधी कुशल डिहायड्रेशनच्या समस्येचा सामना करत होता. रुग्णालयाकडून अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
27 वर्षांचा कुशल मेंडिस श्रीलंकेसाठी आतापर्यंत 49 कसोटी सामने खेळला आहे. 35 च्या सरासरीने त्याने 3 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कुशल मेंडिसने 82 वनडे सामन्यात 30 च्या सरासरीने 2300 धावा केल्या आहेत.
बांगलादेश आणि श्रीलंकेत सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा हा निर्णय चुकीचा ठरला. कारण पहिल्या सात षटकात 24 धावात 5 विकेट गेल्या आहेत.