मुंबई: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडूंचा स्वत:वरचा संयम सुटतो. प्रतिस्पर्धी टीममधील खेळाडूंबरोबर वाद होतात. हे दृश्य आपण अनेकदा लाइव्ह मॅचमध्ये पाहिलं आहे. खरंतर रिटायर झालेल्या क्रिकेटर्सकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसते. मैदानात उतरल्यानंतर ते युवा खेळाडूंसमोर आदर्श निर्माण करतील, अशी अपेक्षा असते. पण लीजेंडस लीग क्रिकेटमध्ये बिलकुल या उलट घडलं. रिटायर झालेले दोन प्रसिद्ध क्रिकेटपटूच आपसात भिडले.
रिटायरमेंट नंतरही वर्तनात बदल झालेला नाही
त्यांचा वाद इतका टोकाला पोहोचला की, हाणामारीची स्थिती उदभवली. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन क्रिकेट खेळताना मैदानावर नेहमीच आक्रमक असायचा. रिटायरमेंटनंतरही त्याच्या वर्तनात बदल झालेला नाही.
भांडण फक्त शाब्दीक वादापुरता मर्यादीत नव्हते
लीजेंडस लीगच्या एका सामन्यात तो पुन्हा विरोधी टीमच्या खेळाडूला भिडला. लाइव्ह मॅचमध्ये मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठानमध्ये वाद झाला. दोघांमधील भांडण फक्त शाब्दीक वादापुरता मर्यादीत नव्हते, तर जॉन्सनने युसूफ पठानला धक्काही मारला.
कुठे झाला वाद?
लीजेंडस लीगच्या सामन्यात ही घटना घडली. वाद इतका वाढला की, अन्य खेळाडू आणि अंपायर्सना मध्यस्थी करावी लागली. जोधपूरमध्ये भीलवाडा किंग्स आणि इंडिया कॅपिटल्समध्ये लीजेंड्स लीगच्या क्वालिफायरचा सामना सुरु होता.
वाद कशावरुन सुरु झाला?
युसूफ पठान फलंदाजी करत होता. त्यावेळी जॉन्सन त्याला काहीतरी बोलला. त्यावर युसूफ पठानने प्रत्युत्तर दिलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यात पठान जॉन्सनला उत्तर देताना दिसतो. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज जॉन्सनने पठानला धक्का मारला.
#ICYMI: Things got really heated in @llct20 between Yusuf Pathan and Mitchell Johnson. ? pic.twitter.com/4EnwxlOg5P
— Nikhil ? (@CricCrazyNIKS) October 2, 2022
जॉन्सनवर बंदी घालणार?
प्रकरण हाताबाहेर जाणार हे लक्षात येताच, अंपायर्स मध्यस्थीसाठी पुढे सरसावले. दोन्ही खेळाडूंना त्यांनी लांब केलं. या भांडणामुळे लीगच्या आयोजकांचाही मूड खराब झाला. आयसीसीच्या नियमानुसार, पठानला हात लावला म्हणून जॉन्सनवर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होऊ शकते.