मुंबई: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतून नवीन टॅलेंट समोर आलं. पण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला तो हार्दिक पंड्याने. हा जुना खेळाडू नवीन रुपात समोर आला. हार्दिक पंड्या (Hardik pandya) मागची काही वर्ष भारताकडून खेळतोय. पण यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पूर्णपणे वेगळा भासला. अनेकांनी त्याच्या बाबतीत अंदाज बांधले होते, त्याला त्याने धक्का दिला. मेगा ऑक्शनमधील गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) रणनितीवर अनेक क्रिकेट पंडितांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. हार्दिक पंड्याची गुजरातच्या कॅप्टनशिपपदावर झालेली नियुक्तीही अनेकांना पटली नव्हती. क्रिकेटच्या भल्या, भल्या जाणकारांनी गुजरात टायटन्सला खिजगणतितही धरलं नव्हतं. आयपीएल 2022 चा सीजन सुरु होण्याआधी गुजरात टायटन्सचा संघ फायनल जिंकेल, असं कोणी म्हटलं असतं, तर त्याच्या क्रिकेटच्या ज्ञानाबद्दल प्रश्न उपस्थित झाले असते. पण त्याच गुजरात टायटन्सचे सर्वांनाच धक्का देत थेट जेतेपदाला गवसणी घातली.
गुजरातच्या विजयात सर्वात मोठ योगदान आहे, ते हार्दिक पंड्याचं. तोच आज हिरो आहे. पण आयपीएल स्पर्धा सुरु होईपर्यंत हार्दिकबद्दल अनेक प्रश्न होते. दोन एक वर्ष तो, दुखापतीचा सामना करतोय. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप नंतर तो पूर्णपणे बाजूला पडला होता. गोलंदाजी दूर राहिली, पण तो पुन्हा मैदानावर परतेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. त्याचं कारण आहे, फिटनेस.
हार्दिक फिटनेसच्या समस्येशी झुंजत होता. आयपीएलआधी त्याला बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट प्रबोधिनीत फिटनेस सिद्ध करावा लागला. आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर पहिल्या सामन्यापासून हार्दिकने कमालीचा परफॉर्मन्स दिला. फायनलमध्ये तर त्याने 34 धावा केल्या व 17 धावांमध्ये तीन विकेट काढल्या. हार्दिकला उत्तम ऑलराऊंडर म्हणून आपण सर्वच ओळखतो. पण या स्पर्धेत त्याची एक वेगळी बाजू दिसली. ती म्हणजे नेतृत्व. हार्दिक पंड्यामध्ये इतका चांगला कर्णधार दडलाय, हे फार लोकांना माहित नव्हतं. ते या आयपीएलच्या निमित्तान समोर आलं.
आयपीएल सुरु होण्याआधी मीडियामध्ये हार्दिकबद्दल बरच लिहिलं गेलं. त्याच्यावर टीका झाली. पण त्यावेळी हार्दिक काय करत होता? कुठे होता? या बद्दल कोणालाच माहिती नाही. आता स्वत: हार्दिकने त्या बद्दल माहिती दिलीय.
“मी आज आनंदी, समाधानी आहे. माझी माझ्याच विरोधात आणि अन्य गोष्टींबरोबर लढाई होती, जी मी जिंकलो. क्वालिफाय होणं, माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. कारण स्पर्धा सुरु होण्याआधी अनेकांनी संशय व्यक्त केला होता. कमबॅक करण्याआधी माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. मला त्यांना कुठलही उत्तर द्यायचं नव्हतं. पण मी जे केलं, ज्या प्रक्रियेमधून गेलो, त्याचा मला अभिमान आहे” असं हार्दिक स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला.
“मी सकाळी पाच वाजता उठून सराव करायचो. त्यानंतर दुपारी चारला पुन्हा सरावाला सुरुवात करायचो. ते चार महिने मी रोज रात्री 9.30 वाजता झोपायचो. मी खूप त्याग केलाय. आयपीएल खेळण्याआधी माझी लढाई सुरु होती. आता निकाल पाहिल्यानंतर क्रिकेटपटू म्हणून मी समाधानी आहे” असं हार्दिक म्हणाला.