नवी दिल्ली : गोलंदाजी करताना प्रत्येक बॉलरचा कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असतो. भले, मग फॉर्मेट कुठलाही असो. मेडन ओव्हर म्हणजे निर्धाव षटक टाकणं ही क्रिकेटमध्ये मोठी बाब आहे. ओव्हरमध्ये एकही धावा न देता गोलंदाजी करण सोप नाहीय. सध्याच्या क्रिकेटमध्ये गोलंदाज मेडन ओव्हर अपवादानेच टाकतात. एक-दोन मेडन ओव्हर टाकण समजू शकतो. पण एका भारतीय गोलंदाजाने तब्बल 21 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. हा गोलंदाज भारताचा होता. त्याच नाव होतं बापू नाडकर्णी. नाडकर्णी यांनी आजच्याच दिवशी हे काम केलं होतं. 1964 साली तेव्हाच मद्रास आताच्या चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट मॅच होती. बापू नाडकर्णी यांनी त्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 21 मेडन ओव्हर टाकल्या होत्या. त्यांचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे. अजूनपर्यंत कुठलाही गोलंदाज सलग 21 मेडन ओव्हर टाकू शकलेला नाहीय.
भारताने या टेस्ट मॅचमध्ये पहिला डाव सात विकेट गमावून 457 धावांवर घोषित केला होता. 10 जानेवारीला हा कसोटी सामना सुरु झाला होता. 11 जानेवारीला इंग्लंडची फलंदाजी सुरु होती. या दिवशी बापू नाडकर्णी यांच्याहाती चेंडू सोपवल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना धावा बनवण कठीण होऊन बसलं.
21 मेडन ओव्हर टाकून किती विकेट काढल्या?
इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये बापू नाडकर्णी यांनी फलंदाजांना धावा करु दिल्या नाहीत. सलग 21 मेडन ओव्हर टाकल्या. इतकी किफायती गोलंदाजी करुनही त्यांना एक विकेटही मिळाली नाही. बापू नाडकर्णी यांनी पहिल्या इनिंगमध्ये 32 ओव्हर टाकून फक्त 5 धावा दिल्या. त्यांनी एकूण 27 मेडन ओव्हर टाकल्या. त्यांची इकॉनमी 0.15 होती. बापू नाडकर्णी अचूक लाइन-लेंग्थसाठी ओळखले जायचे. ते फलंदाजांना धावा करण्याची संधीच द्यायचे नाहीत. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा त्यांनी शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात 6 पैकी 4 ओव्हर मेडन टाकल्या. या इनिंगमध्ये त्यांना विकेट मिळाला. सहा रन्स देऊन त्यांनी दोन विकेट काढले.
टेस्ट मॅचचा निकाल काय लागला?
या टेस्ट मॅचमध्ये भारताने पहिल्या इनिंगमध्ये मोठा स्कोर केला. इंग्लंडला कमी धावसंख्येवर रोखलं. पण तरीही भारत विजय मिळवू शकला नाही. मॅच ड्रॉ झाली. इंग्लंडने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये 317 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाकडे 140 धावांची आघाडी होती. भारतीय फलंदाज दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी ठरले नाहीत. भारताने आपला दुसरा डाव 9 विकेट गमावून 152 धावांवर घोषित केला. इंग्लंडने पाच विकेट गमावून 241 धावा केल्या. सामना ड्रॉ झाला.