टी-20 वर्ल्ड कप जिंकून आणणाऱ्या टीम इंडियावर बक्षीसांचा अक्षरश: पाऊस पडताना दिसत आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांच्या बक्षीसाची आधीच घोषणा केली आहे. यानंतर राज्य सरकारकडून टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. या चारही खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आणखी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. विधान भवनाच्या सेंट्र्ल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी 11 कोटींच्या बक्षिसाची मोठी घोषणा केली.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी सूर्यकुमारला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी लागेल, असं बजावलं. सूर्यकुमारने पुढचा वर्ल्ड कप देखील जिंकून आणू, असं आश्वासन आज विधान भवनमधील कार्यक्रमात दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. “रोहित आणि सूर्यकुमार यांनी सांगितलं की, मुंबईत एमएमआरमध्ये नवीन खेळाडू तयार केले पाहिजेत. त्यासाठी जे काही आवश्यक सहकार्य असेल, जागा असेल, जी काही आवश्यक मदत असेल ते सरकार आपल्याला करेल. कारण तुम्ही खेळाडूंची हॅक्टरी निर्माण करणारे खेळाडू आहेत”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी याबाबतही महत्त्वाची घोषणा केली.
यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने मराठीत भाषण केलं. “सर्वात आधी माझा सर्वांना नमस्कार. मुख्यमंत्री साहेब आम्हाला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल खूप धन्यवाद. सर्वांना बघून खूप वरं वाटलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की, असा कार्यक्रम कधी इथे झाला नाही. मला बघून खूप आनंद झाला की, असा कार्यक्रम आमच्यासाठी आयोजित केला. वर्ल्ड कप भारतात आणायचं हे आमचं सर्वांचं स्वप्न होतं. आम्ही 11 वर्ष थांबलेलो. आम्ही 2013 मध्ये शेवटची चॅम्पियन ट्रॉफी जिंकलो होतो. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आभारी आहे. सर्व सहकाऱ्यांमुळे झालं. मी नशीबवानसुद्धा आहे, कारण मला जे खेळाडू संघात मिळाले ते सर्व चांगले खेळाडू होते. सगळ्यांनी जेव्हा संघात गरज होती तेव्हा परिस्तिथीनुरुप सर्वांनी आपलं महत्त्वाचं योगदान दिलं. सूर्याने आता सांगितलं की, त्याचा हातात बॉल बसला. बरं झालं तो बॉल बसला. नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं”, अशी मिश्किल टिप्पणी रोहित शर्माने केली.
सूर्यकुमार यादव यानेदेखील यावेळी मराठीत भाषण केलं. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही संधी दिली. सर्वांना भेटून खूप चांगलं वाटत आहे. जे मी काल बघितलं ते मी कधी विसरु शकत नाही. तसेच मी इथेसु्द्धा आज बघतोय, इथलेदेखील क्षण मी कधी विसरु शकत नाही. थँक्यू सो मच. मी काय म्हणू? माझे शब्द संपले आहेत. मला माहिती नाही, मला काय बोलायचं, थँक्यू सो मच. इकडे येऊन खूप चांगले वाटले. आमचे बीसीसीआयचे ट्रेझर आशिष शेलार हे सुद्धा काल आम्हाला घ्यायला आले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जे काल बघितलं, आपल्या मुंबई पोलिसांनी जे काल केलंय, ते मला वाटत नाही की, कोणी असं करु शकतं. आम्हाला असंच प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करतो. नंतर परत आपण अजून एक वर्ल्ड कप जिंकू”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.