धर्मशाळा : 31 व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी (सब ज्युनियर) अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने इतिहास रचला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या उना येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेली स्पर्धा महाराष्ट्राने सहज जिंकली. बुधवारी झालेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी कर्नाटकवर आणि किशोरींनी पंजाबवर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह सहाव्यांदा अजिंक्यपद मिळवले. महाराष्ट्राच्या किशोर गटाने आतापर्यंत ही स्पर्धा 10 वेळा जिंकली आहेत, तर किशोरी गटाने 15 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. विशेष म्हणजे किशोर गटाने सलग सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. (Maharashtra Emerges Champions In Junior National Kho Kho Championship)
गेल्या वर्षी ही स्पर्धा झारखंड येथे खेळवण्यात आली होती. तेव्हा महाराष्ट्राच्या किशोर गटाने विजेतेपद मिळवलं होतं, तर किशोरींना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. महाराष्ट्राने यंदा मात्र दुहेरी मुकुट पटकवला आहे. अशी कामगिरी माहाराष्ट्राने आतापर्यंत 6 वेळा केली आहे. दरम्यान, या स्पर्धेतील ‘भरत’ पुरस्कार महाराष्ट्राच्या आशीष गौतमला प्रदान करण्यात आला तर सानिका चाफेला ‘ईला’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
यंदा किशोर गटात कर्नाटकला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तर पश्चिम बंगाल आणि हरयाणाचे संघ तिसऱ्या क्रमाकावर राहिले. तर किशोरी गटात पंजाबचा संघ उपविजेता ठरला. राजस्थान आणि दिल्लीने तिसरा क्रमांक पटकावला.
किशोर गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राला 10 तर कर्नाटक संघाला 6 गुण मिळाले. किशोरींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला 11 तर पंजाबला 3 गुण मिळाले. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री वीरेंद्र कंवर यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंचा गौरव करण्यात आला. कंवर म्हणाले की, “हिमाचल ही वीर भूमी आणि देवभूमी म्हणून ओळखली जातेच, तसेच ही आता खेळ भूमी म्हणून ओळखली जाईल. आपलं राज्य क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या मदतीने राज्य सरकार क्रीडा आणि खेळाडूंसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत आहे.”
कंवर म्हणाले की, “उना जिल्ह्याने पद्मश्री चरणजीत सिंग, दीपक ठाकूर आणि निषाद कुमार असे अनेक खेळाडू देशाला दिले आहेत ज्यांनी अनेक पदके जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक वाढवला आहे. केंद्र सरकारने खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत या क्षेत्रात बरेच काम केले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.”
दरम्यान, यावेळी गोसेवा आयोगाचे उपाध्यक्ष अशोक शर्मा, जिल्हा भाजप अध्यक्ष मनोहर लाल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्ण पाल शर्मा, राज्य खो-खो संघाचे अध्यक्ष राकेश ठाकूर, खो-खो फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष राकेश ठाकूर यांच्यासह विविध खो-खो संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सरचिटणीस एम. एस. त्यागी व इतर खो-खो युनियन उपस्थित होते.
इतर बातम्या
IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
Cricket :जसप्रीत बुमराहची टेस्ट रँकिंगमध्ये घसरण, शाहीन आफरीदीची टॉप 5 पर्यंत मजल
IPL 2022 : विराट कोहलीच्या जागी हा खेळाडू होणार आरसीबी टीमचा नवा कॅप्टन
(Maharashtra Emerges Champions In Junior National Kho Kho Championship)