नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका स्पोर्ट्स फर्ममधील त्याच्या माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. मिहिर दिवाकरने 2017 मध्ये क्रिकेटपटू एमएस धोनीच्या नावाने जगभरात क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी करार केला होता. परंतु, तक्रारीनुसार, करारात नमूद केलेल्या अटीनुसार काम झाले नाही. त्यानंतर धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्या विरोधात रांची कोर्टात फौजदारी खटला दाखल केला आहे. मिहिर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र आहे आणि त्याचा बिझनेस पार्टनरही आहे.
महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2021 रोजी अर्का स्पोर्ट्सचे अधिकार पत्र मागे घेतले. धोनीने त्याला अनेक कायदेशीर नोटीस पाठवल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी दावा केला आहे की अर्का स्पोर्ट्सने त्याची फसवणूक केली आहे, ज्यामुळे त्याचे 15 कोटींहून अधिकचे नुकसान झाले आहे.
धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. धोनीने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत. 2007 चा T20 विश्वचषक, 2011 विश्वचषक, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने आतापर्यंत 5 वेा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केला आहे. धोनी आता आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने 250 IPL सामन्यात 5082 धावा केल्या आहेत.
धोनीने रांची कोर्टात लॉ फर्मच्या माध्यमातून ही तक्रार दाखल केली आहे. अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या विरोधात चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) कर्णधाराने ही तक्रार दाखल केली आहे. धोनीला 15 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
महेंद्रसिंग धोनीने भारतासाठी 90 कसोटी सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याने 4876 धावा केल्यात. धोनीने 350 वनडे सामन्यांमध्ये 10,773 धावा केल्या आहेत. 98 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 1617 धावा केल्या आहेत. धोनीने यष्टिरक्षक म्हणून कसोटीत 256 कॅच आणि 38 स्टंपिंग केले आहेत. तर वनडेमध्ये 321 कॅच आणि 123 स्टंपिंग केले आहेत.T20 मध्ये धोनीने 57कॅच आणि 34 स्टंपिंग केले आहेत.