ब्रिस्बेन: इंग्लंडचा मार्क वुड वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या वेगवान चेंडूंनी नेहमीच फलंदाजांची डोकेदुखी वाढवलीय. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत मार्क वुड इंग्लंडकडून खेळतोय. मंगळवारी त्याने न्यूझीलंड विरुद्ध आपल्या वेगाची ताकत दाखवली. वुडने न्यूझीलंड विरुद्ध या टुर्नामेंटमध्ये स्पर्धेतील आतापर्यंत चा सर्वात वेगवान चेंडू टाकला. पण न्यूझीलंडच्या फलंदाजाने हा वेगवान चेंडू आपलं काही बिघडवू शकत नाही, हे दाखवून दिलं.
मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी सहा विकेट गमावून 179 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातील विकेट या वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल आहेत. तिथे वेगवान गोलंदाजांना पीचकडून साथ मिळते. चेंडूला चांगला बाऊन्स मिळतो. ब्रिस्बेनच्या पीचवर वुडने आपल्या वेगाची झलक दाखवली. इंग्लंडने हा सामना 20 धावांनी जिंकला.
टुर्नामेंटमधील वेगवान चेंडूवर चौकार
न्यूझीलंडची बॅटिंग सुरु असताना मार्क वुड सहावी ओव्हर टाकत होता. त्याने शेवटच्या चेंडूवर आपली ताकत दाखवली. वुडने 155 किलोमीटर प्रतितास वेगवान चेंडू टाकला. या चेंडूवर त्याने चौकार खाल्ला. वुडने चेंडू ऑफ स्टम्पवर फुल लेंग्थ टाकला. फिलिप्सने त्यावर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागला. फाइन लेगला चौकार मिळाला.
152 KMPH चेंडूवर सिक्स
त्यानंतर मार्क वुडने 12 वी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्येही त्याने आपल्या बॉलिंगचा वेग दाखवला. ओव्हरचा तिसरा चेंडू 152 किलोमीटर प्रतितास वेगाने टाकला. न्यूझीलंडच्या फिलिप्सने हा चेंडू बॅटच्या मधोमध घेतला व सिक्स मारला. वुडने फिलिप्सच्या पायामध्ये हा चेंडू टाकला होता. त्याने बॅटच्या मधोमध हा चेंडू घेऊन लाँग ऑनला षटकार ठोकला.
फिलिप्सची हाफ सेंच्युरी
फिलिप्सने या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. त्याने 36 चेंडूंचा सामना केला. यात चार चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याने 62 धावा फटकावल्या. 18 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सॅम करनने त्याला आऊट केलं. न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 159 धावा केल्या.