नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : मधल्या काळात संपूर्ण क्रिकेट विश्व एका गोष्टीमुळे हादरलं होतं. त्यामुळे भल्या भल्या क्रिकेटपटूंच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ठ लागलं होतं. अनेकांना घरी जावं लागलं होतं. तर अनेकांना बदनामीला सामोरे जावं लागलं होतं. ती गोष्टच तशी होती. त्यानंतर जगभरातील क्रिकेट विश्वाने अंग झटकलं होतं. आणि पुन्हा ती गोष्ट होणार नाही याची खबरदारी घेतली होती. पण आता त्याच गोष्टीने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे.
एव्हाना ती गोष्ट तुम्ही समजला असाल. ज्या गोष्टीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं ती गोष्ट म्हणजे मॅच फिक्सिंग. क्रिकेट जगताच्या मानगुटीवर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचं भूत बसलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनेच या भ्रष्ट प्रकरणावर प्रकाश टाकलाय. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलेन म्हणजे आयसीसीने मॅच फिक्सिंगचा खुलासा केला आहे. याप्रकरणी तीन भारतीयांसह 8 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
आयसीसी 2021 यूएई टी-10 लीग दरम्यान झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करत आहे. या चौकशीनंतर आयसीसीने या गैरप्रकारा प्रकरणी 8 खेळाडू, अधिकारी आणि काही भारतीय टीमचे मालकांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहेत. दोन भारतीय सह मालक पराग संघवी आणि कृष्ण कुमार यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. हे दोघेही पुणे डेव्हिल्सचे सह मालक आहे. त्या सीजनमध्ये त्यांचा एक खेळाडू बांगलादेशचा माजी कसोटी पटू नासिर हुसैनवरही लीगने भ्रष्टाचार विरोधी संहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला आहे.
या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एक कोचही आहे. सनी ढिल्लो असं या कोचचं नाव आहे. 2021मध्ये पार पडलेल्या अबू धाबी टी-10 क्रिकेट लीग आणि त्या टुर्नामेंटमधील सामन्यांना भ्रष्ट करण्याच्या संबंधित हे आरोप असल्याचं आयसीसीने म्हटलं आहे. आयसीसीला या टुर्नामेंटसाठी ईसीबीने भ्रष्टाचार विरोधी अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं. आणि अशा प्रकारे ईसीबीकडून हे आरोप केले जात आहेत.
संघवीवर मॅचचे निकाल आणि अन्य गोष्टींवर सट्टा लावण्याचा तसेच चौकशी यंत्रणांना सहकार्य न करण्याचा आरोप आहे. तर कृष्ण कुमार यांच्यावर डीएसीओकडे माहिती लपवल्याचा आरोप आहे. त्या शिवाय कोच ढिल्लोंवर मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बांगलादेशासाठी 19 टेस्ट आणि 65 इंटरनॅशनल वनडे मॅच खेळणाऱ्या नासिरवर डीएसीओने 750 डॉलरहून अधिक रकमेच्या भेटवस्तूंची माहिती न दिल्याचा आरोपआहे.
इतर ज्या खेळाडूंना निलंबित करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोच अजहर जैदी, यूएईचा खेळाडून रिजवान जावेद, सालिया समन आणि टीम मॅनेजर शादाब अहमद यांचा समावेश आहे. या प्रकरणी तीन भारतीयांसह सहा लोकांना तात्पुरतं निलंबित करण्यात आलं आहे. या सर्वांना मंगळवारपासून 19 दिवसाच्या आत उत्तर देण्यास सांगितलं गेलं आहे.