मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची एन्ट्री, कुणाला टेन्शन?

| Updated on: Jul 06, 2024 | 1:26 PM

जर नाना पटोले अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले तर यंदाची मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक रंगतदार होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, काँग्रेसच्या या नेत्याची एन्ट्री, कुणाला टेन्शन?
Follow us on

MCA Election 2024 : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी क्रिकेटच्या राजकारणात प्रवेश केला आहे. नाना पटोले यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक 23 जुलै रोजी पार पडणार आहे.

नाना पटोलेंचा अर्ज

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे नाना पटोले यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात होते. अखेर नाना पटोले यांनी गेल्या मंगळवारी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

MCA च्या अध्यक्षपदाची जागा रिक्त

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. यासाठी येत्या 23 जुलैला निवडणूक होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र हे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूरपर्यंत आहे. देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे. त्यामुळे जर नाना पटोले अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले तर यंदाची मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक रंगतदार होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

माझगाव क्रिकेट क्लब धुरा नाना पटोलेंकडे

नाना पटोले यांच्या आधी अनेक नेत्यांनी माझगाव क्रिकेट क्लबचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांनंतर आता माझगाव क्रिकेट क्लबची धुरा नाना पटोलेंच्या हाती सोपवण्यात आली आहे. तसेच मनोहर जोशी, शरद पवार हे देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत.