दुबई: T20 वर्ल्ड कप 2022 संपलाय. ऑस्ट्रेलियात ही टुर्नामेंट झाली. इंग्लंडने पाकिस्तानला 5 विकेटने हरवून किताब जिंकला. आता सगळ्यांच्या नजरा 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपवर आहेत. त्याचे क्वालीफायर्सचे सामने सुरु झाले आहेत. याच दरम्यान 20 वर्षाच्या मार्टिन अकाएजुने आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना भांबावून सोडलं.
क्वीफायर्समध्ये मार्टिनची गोलंदाजी पाहून फलंदाजाला भिती वाटली. रवांडाच्या मार्टिनने बोत्सवाना विरुद्ध इतका वेगवान चेंडू टाकला की, स्टम्पसचे दोन तुकडे झाले.
स्टार्कच्या गोलंदाजीची आठवण
आयसीसीने मार्टिनच्या या भेदक गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केलाय. मार्टिनच्या चेंडूने फॅन्सना मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीची आठवण करुन दिली. डॅरेन ब्राव्हो विरुद्ध मागच्यावर्षी बारबाडोसमध्ये त्याने हा चेंडू टाकला होता. स्टार्कच्या चेंडूने स्टम्प उखडला गेला होता.
मार्टिनने घेतल्या 4 विकेट
मार्टिनच्या खतरनाक गोलंदाजीने स्टम्पच तोडला. त्याच्या लाजवाब गोलंदाजीच्या बळावर रवांडाने 5 विकेटने सामना जिंकला. बोत्सवानाच्या टीमने पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हर्समध्ये 106 धावांवर त्यांची इनिंग संपली. मार्टिनने 16 धावात 4 विकेट घेतल्या.
स्टम्पचे 2 तुकडे
थायाओने त्शोसे स्ट्राइकवर होता. 17 वी ओव्हर सुरु होती. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मार्टिनने त्शोसेला बोल्ड केलं. स्टम्पसचे दोन तुकडे झाले. बोत्सवानाने विजयासाठी 107 धावांच लक्ष्य दिलं होतं. रवांडाने 16 चेंडू आणि 5 विकेट राखून विजय मिळवला. रवांडाकडून दुसिंगिजिमानाने सर्वाधिक 32 धावा केल्या.
मार्टिनने फटकावलं अर्धशतक
मार्टिनने मागच्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. एकावर्षात तो 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्याने 147 धावा फटकावल्या व 17 विकेट घेतले. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप उपक्षेत्रीय आफ्रिका क्वालीफायर ग्रुपमध्ये त्याने 9 धावात 4 विकेट घेतल्या होत्या. ते त्याच सर्वोत्तम प्रदर्शन आहे.
मार्टिनच्या नावावर एक आंतरराष्ट्रीय अर्धशतकही आहे. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात घाना विरुद्ध डेब्यु मॅचमध्ये त्याने ते फटकावलं होतं. 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कपच यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरिका भूषवणार आहे.