मुंबई: ‘करो या मरो’ सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 159 धावा केल्या आहेत. Mumbai Indians ला विजयासाठी 160 धावांची आवश्यकता आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात विजय मिळवला, तर त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे उघडतील. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने बाजी मारली, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) टीम प्लेऑफमध्ये पोहोचेल. मुंबई इंडियन्सच्या लेखी प्रतिष्ठा राखण्यासाठी विजय मिळवणं एवढच या सामन्याचं महत्त्व आहे. पण दिल्ली आणि आरसीबीसाठी असं नाहीय. मुंबईने आज जिंकाव, अशी तमाम आरसीबीच्या चाहत्यांची इच्छा असेल.
मुंबईने आजच्या सामन्यात सुरुवात चांगली केली होती. 50 धावात दिल्लीचे आघाडीच चार फलंदाज तंबूत परतले होते. पण पाचव्या विकेटसाठी रोव्हमॅन पॉवेल आणि कॅप्टन ऋषभ पंतने 75 धावांची भागीदारी केली. पॉवेल आणि पंतने दिल्लीचा डाव सावरला. रोव्हमॅन पॉवेलने 34 चेंडूत 43 धावांची खेळी केली. यात एक चौकार आणि चार षटकार आहेत. ऋषभने 33 चेंडूत 39 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार आहे. अखेरीस अक्षर पटेलने थोडीफार फटकेबाजी केली. त्यामुळे दिल्लीला लढण्याइतपत टार्गेट मुंबईला देता आले.
आक्रमक सलमीवीर डेविड वॉर्नरला अवघ्या 5 रन्सवर डॅनियल सॅम्सने जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केलं. त्यानंतर मागच्या काही सामन्यात दमदार खेळ करणारा मिचेल मार्शला आज भोपळाही फोडता आला नाही. जसप्रीत बुमराहने त्याला कॅप्टन रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. रोहितने स्लीपमध्ये खूपच अप्रतिम झेल घेतला. रोहितकडून खूप दिवसांनी स्लीपमध्ये इतकं अप्रतिम क्षेत्ररक्षण पहायला मिळालं. पृथ्वी शॉ चांगली फलंदाजी करत होता. पण त्याला जसप्रीत बुमराहने बाऊन्सवर आऊट केलं. बुमराहने टाकलेला बाऊन्सर इतका जबरदस्त होता की, पृथ्वी शॉ ला तो खेळताच आला नाही. पृथ्वी हा बाऊन्सर फेस करताना, खाली पडला. चेंडू त्याच्या बॅटच्या दांड्याला लागून मागे गेला. विकेटकीपर इशान किशनने डाइव्ह मारुन झेल घेतला. पृथ्वीने 24 धावा केल्या.