मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 15 वा सीजन सुरु झाल्यापासून जसप्रीत बुमराहकडून भरपूर अपेक्षा होत्या. भारताचा हा प्रमुख गोलंदाज मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) जबरदस्त कामगिरी करेल, असा सर्वांना विश्वास होता. पण जसप्रीत बुमराहला दुसऱ्याबाजूने साथ मिळत नव्हती. डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स यांच्यासारखा तो महागडा गोलंदाज ठरला नाही. पण त्याला विकेट मिळत नव्हत्या. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर काही फलंदाजांनी बऱ्यापैकी धावा सुद्धा काढल्या. आगमी टीम इंडियाचा सीजन लक्षात घेता, जसप्रीत बुमराहचं (Jasprit bumrah) आऊट ऑफ फॉर्म असणं चाहत्यांची चिंता वाढत होती. पण अखेर आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपली दाहकता दाखवून दिला. त्याने कमालाची स्पेल टाकला.
नितीश राणा, आंद्र रसेल, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स आणि सुनील नरेन यांच काहीच चाललं नाही. आंद्रे रसेल सारखा बिग हिटर सुद्धा जसप्रीत बुमराहसमोर हतबल दिला. त्याला आऊट करण्याआधी बुमराहने आधी परफेक्ट यॉर्कर टाकला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर रसेलला 9 धावांवर पोलार्डकरवी झेलबाद केले. जसप्रीत बुमराहने आज चार षटकात 10 धावा देत पाच विकेट काढल्या. यात एक ओव्हर मेडन होती. त्यावरुन जसप्रीत बुमराहने आज काय गोलंदाजी केली असेल, याची कल्पना येते.
जसप्रीत बुमराहचा खतरनाक स्पेल इथे क्लिक करुन पहा
जसप्रीत बुमराहने आज फायरी स्पेल टाकला. त्याच्या भात्यातून निघालेल्या चेंडूंनी केकेआरचा गेम केला. वेकंटेश अय्यरने ज्या पद्धतीची सुरुवात केली होती. ते पाहता केकेआरचा संघ 180-190 धावसंख्या सहज उभारेल असं वाटलं होतं. पण बुमराहच्या वादळापुढे सर्वच थांबलं. केकेआरने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 165 धावा केल्या. केकेआरकडून सर्वाधिक वेंकटेश अय्यर 43 आणि नितीश राणाने 43 धावा केल्या.
पावरप्लेच्या सहा षटकात केकेआरच्या एक बाद 64 धावा झाल्या होत्या. सलामीवीर वेंकटेश अय्यरने आज आक्रमक सुरुवात केली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. वेंकटेशने डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन आणि रायली मेरेडिथ यांच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्याने दणक्यात पुनरागमन केल्याचे संकेत दिले.