मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 15 वा हंगाम सुरु झाल्यापासून मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ संघर्ष करतोय. अजूनही मुंबई इंडियन्सची टीम पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबई आज आपली आठवी मॅच खेळणार आहे. याआधीच्या सातही सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झालाय. मुंबई इंडियन्ससाठी आजचा दिवस खास आहे. त्यामुळे मुंबईची टीम आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करेल, यात तिळमात्र शंका नाही. भारताचा महान क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) आज वाढदिवस आहे. सचिनने आज वयाच्या 49 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सचिन साठी आजचा दिवस खास आहेच. पण मुंबई इंडियन्सच्या विजयाने तो अधिक स्पेशल होईल. मुंबई इंडियन्सचा विजय हे सचिनसाठी गिफ्ट असेलच, पण त्याचवेळी सचिनचा मुलगा अर्जुनलाही मुंबई इंडियन्स आज डेब्यू कॅप सोपवू शकते.
म्हणजेच अर्जुन आजच्या सामन्यातून आयपीएलमध्ये डेब्यु करु शकतो. सचिनच्या हस्तेच अर्जुनला डेब्यु कॅप दिली जाईल, असा अनेकांनी कयास बांधला आहे. मुंबई इंडियन्सच्या मागच्या दोन-तीन सामन्यांपासून अर्जुन तेंडुलकर डेब्यु करणार अशी चर्चा आहे. ही चर्चा आज प्रत्यक्षात खरी ठरु शकते. कारण मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ज्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांना संधी दिली, ते फार यशस्वी ठरलेले नाहीत.
डॅनियल सॅम्स, टायमल मिल्स आणि जयदेव उनाडकट यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. मागच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात जयदेव उनाडकट सारख्या अनुभवी गोलंदाजाला शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांचा बचाव करता आला नव्हता. त्याआधी डॅनियल सॅम्स, टायमल मिल्स हे डावखुरे वेगवान गोलंदाजही फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला संधी देऊन पहायला हरकत नाही.
अलीकडेच मुंबई इंडियन्सने त्याचा एक व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला होता. त्यात त्याने यंदाच्या मेगा ऑक्शनमधला सर्वात महागडा खेळाडू इशान किशनच्या परफेक्ट यॉर्करवर दांड्या उडवल्या होत्या. त्याच्या चेंडूमध्ये ती भेदकता दिसली होती. अर्जुनने मुंबईसाठी नेट बॉलर म्हणूनही गोलंदाजी केली आहे.