मुंबई: सीएसकेच्या बरोबरीने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघही यंदाच्या सीजनमध्ये खराब कामगिरी करतोय. मुंबई इंडियन्सचा संघ चार सामने खेळला असून चारही मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. बुधवारी मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध होणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हा सामना होईल. या सामन्याआधी संघातील प्रमुख खेळाडू आणि दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टीमच्या चाहत्यांना आश्वासन दिलं आहे. “सीजनची खराब सुरुवात झाली असली, तरी आम्ही हार मानणार नाही. कमबॅकसाठी निकाराची झुंज देऊ” असं बुमराह म्हणाला. 2014 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने पाच पराभवानंतर जोरदार कमबॅक केलं होतं. 2015 मध्येही चार पराभवानंतर कमबॅक केलं होतं. मुंबई इंडियन्सचा संघ कमबॅकसाठी ओळखला जातो. या सीजनमध्येही असंच काही घडलं, तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
जसप्रीत बुमराहसाठी भूतकाळ महत्त्वाचा नाहीय. त्याच्यासाठी वर्तमानकाळ महत्त्वाचा आहे. पंजाब किंग्स विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी मंगळवारी पत्रकार परिषद झाली. त्यात बुमराहने इतिहास महत्त्वाचा नाहीय, असं सांगितलं.
“आतापर्यंत जे काही घडलय तो भूतकाळ आहे. इतिहास महत्त्वाचा नाहीय. कारण तो एक वेगळा संघ होता. वेगळी वेळ होती. आता आपण वर्तमानात आहोत. अजूनपर्यंत ठरवल्यानुसार गोष्टी घडलेल्या नाहीत. क्रिकेटचा खेळच असा आहे. जेव्हा आव्हान येतं, त्यावेळी तुम्ही त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करता” असं जसप्रीत बुमराह म्हणाला.
आयपीएल 2022 मध्ये संघांनी धावांचा पाठलाग करताना चांगलं प्रदर्शन केलं आहे. मुंबई इंडियन्सचा फक्त एकदाच धावांचा पाठलाग करण्याची संधी मिळाली आहे. टॉस जिंकणं महत्त्वाच आहे, असं बुमराह म्हणाला. “नव्या चेंडूने मदत मिळते. चांगला टप्पा राखला पाहिजे. चेंडू स्विंग करण्याचा फायदा होईल” असं बुमराहने सांगितलं.
मागच्या सीजनपर्यंत मुंबई इंडियन्स मधून खेळणारे अनेक खेळाडू आता नवीन संघातून खेळतायत. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईने आपला नवीन संघ तयार केला. नव्या सीजनमध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. “मुंबईचा संघ सध्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जातोय. प्रत्येक संघाला यामधून जावं लागणार आहे. प्रत्येक संघाला परिवर्तनाचा सामना करावा लागतोय. या सीजनमध्ये दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. आमचे अनेक जुने खेळाडू नव्या संघामधून खेळतायत. परिवर्तनाच्या या प्रक्रियेतून प्रत्येक संघाला जावं लागतं. आम्ही त्याच टप्प्यावर आहोत. आमच्याकडे नवीन ग्रुप आहे” असं जसप्रीत बुमराह म्हणाला.