MI vs SRH Result IPL 2023 : आपली मुंबई जिंकली, ग्रीनची सेंच्युरी, आता लक्ष RCB vs GT मॅचवर

| Updated on: May 21, 2023 | 7:43 PM

MI vs SRH Result IPL 2023 : मस्ट वीन मॅचमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी आज जबरदस्त कामगिरी केली. लखनऊ विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी विलन ठरलेला कॅमरुन ग्रीन आज हिरो ठरला. त्याने तुफान बॅटिंग केली.

MI vs SRH Result IPL 2023 : आपली मुंबई जिंकली, ग्रीनची सेंच्युरी, आता लक्ष RCB vs GT मॅचवर
MI vs SRH IPL 2023
Follow us on

मुंबई : प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आज सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट राखून शानदार विजय मिळवला. कॅमरुन ग्रीनची सेंच्युरी हे मुंबईच्या विजयाच वैशिष्टय ठरलं. त्याने 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 8 फोर आणि 8 सिक्स आहेत. या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचे 16 पॉइंट्स झाले आहेत. मुंबईच्या चाहत्यांच लक्ष आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्सच्या मॅचवर असणार आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पराभव झाल्यास मुंबईचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल.

मुंबईसाठी आज कॅमरुन ग्रीन हिरो ठरला. 16 कोटी रुपये मोजून विकत घेतलेला हा खेळाडू लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या फॅन्ससाठी मोठा विलन ठरला होता. लास्ट ओव्हरमध्ये मुंबईला 11 धावांची गरज होती. पण ग्रीन आणि डेविड जोडीला विजयी लक्ष्यापर्यंत टीमला पोहोचवता आलं नव्हतं. त्यावेळी कॅमरुन ग्रीनवर बरीच टीका झालेली.

ग्रीनने सगळी कसर काढली भरुन

पण आज मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजाने सर्व कसर भरुन काढली. इशान किशन आऊट झाल्यानंतर ग्रीन मैदानावर आला. त्याने सुरुवातीपासूनच SRH च्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. हैदराबादच्या एकाही बॉलरच त्याच्यासमोर काही चाललं नाही. ग्रीनने चौफेर फटकेबाजी केली. त्याने 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 8 फोर आणि 8 सिक्स आहेत.

हिटमॅनला अखेर सूर गवसला

भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर इशान किशन 12 चेंडूत 14 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर ग्रीन मैदानात आला. कॅप्टन रोहित शर्मा आणि ग्रीनची जोडी आज चांगलीच जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माला आज महत्वाच्या सामन्यात सूर गवसला. त्याने 37 चेंडूत 56 धावा करताना 8 फोर, 1 सिक्स मारला.


सूर्याचा आजही दमदार खेळ

रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीनने मुंबईचा विजय सुनिश्चित केला. सूर्याने 16 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. यात 4 चौकार होते. तत्पूर्वी सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सची कमकुवत बाजू असलेल्या बॉलिंगचा फायदा उचलला व धावफलकावर 200 धावा लावल्या.

मुंबईकडून आकाश मधवालची जबरदस्त गोलंदाजी

विवरांत शर्मा 47 चेंडूत 69 धावा आणि मयंक अग्रवाल 46 चेंडूत 83 धावा यांच्या फलंदाजीच्या बळावर सनरायजर्स हैदराबाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 200 धावा केल्या. मुंबईने अखेरच्या ओव्हर्समध्ये थोडी चांगली गोलंदाजी केली. मुंबईकडून आकाश मधवालने 4 ओव्हर्समध्ये 37 धावा देत 4 विकेट घेतल्या.