ब्रिस्बेन: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये सोमवारी ऑस्ट्रेलियाने आयर्लंडला 42 धावांनी हरवलं. ऑस्ट्रेलियाच्या विजयात एरॉन फिंचने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या मॅचमध्ये मिचेल स्टार्कच्या दोन चेंडूंची भरपूर चर्चा झाली. मिचेल स्टार्कने आयर्लंडच्या दोन विकेट काढल्या. एकाच ओव्हरमध्ये त्याने या दोन विकेट काढल्या. मिचेल स्टार्कने यॉर्कर चेंडूवर या दोन्ही विकेट काढल्या. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
हा चेंडू समजलाच नाही
मिचेल स्टार्क चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला होता. त्याने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये आयर्लंडला धक्के दिले. त्याने कर्टिस कॅफरला बोल्ड केलं. मिचेल स्टार्कचा हा इनस्विंगिंग यॉर्कर होता. कर्टिस कॅफरला हा चेंडू समजलाच नाही. याच ओव्हरमध्ये जॉर्ज डॉकरेल स्टार्कच्या चेंडूवर बोल्ड झाला. हा चेंडू सुद्धा यॉर्कर होता. हा चेंडू खेळणं इतकं सोप नव्हतं.
स्टार्कचे मन जिंकणारे दोन यॉर्कर
मिचेल स्टार्कचे हे दोन्ही चेंडू कमालीचे होते. टुर्नामेंटमधले हे सर्वोत्तम चेंडू असल्याचं म्हटलं जातय. मिचेल स्टार्कने या टुर्नामेंटमध्ये काही खास प्रदर्शन केलं नाहीय. त्याने तीन मॅचमध्ये तीन विकेट काढले. इकॉनमी रेटही प्रतिओव्हर 8 रन्सपेक्षा जास्त होता. स्टार्कची गोलंदाजी पाहून त्याला सूर गवसलाय असं दिसतय.
आयर्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया विजयी
गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने 42 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 179 धावा केल्या. कॅप्टन एरॉन फिंचने 44 चेंडूत 63 धावा फटकावल्या. त्याशिवाय स्टॉयनिसने 25 चेंडूत 35 धावा केल्या. आयर्लंडकडून फक्त लॉर्कन टकरने जबरदस्त बॅटिंग केली. त्याने 48 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. आयर्लंडचा डाव 137 धावात आटोपला. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या चार सामन्यात पाच पॉइंट झालेत. गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत न्यूझीलंड विरुद्ध त्यांचा पराभव झाला. अफगाणिस्तान विरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाली.