मुंबई: मागच्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट (Indian Cricket) वर्तुळात जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळणार? याची चर्चा सुरु होती. विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर टीम इंडियात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) बुमराहच्या जागी मेन स्क्वाडमध्ये समावेश करण्यात आला आहे.
अनुभव लक्षात घेता तोच या जागेसाठी प्रमुख दावेदार
जसप्रीत बुमराह बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेला. आता त्याच्याजागी शमीचा समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीची स्टँडबाय म्हणजे रिझर्व्ह खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. आता त्याची मुख्य टीममध्ये निवड झालीय. मोहम्मद शमीचा अनुभव लक्षात घेता तोच या जागेसाठी प्रमुख दावेदार होता. मोहम्मद शमीला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं निश्चित आहे.
कोविड-19 ची लागण झालेली
मोहम्मद शमी खराब फिटनेसमुळे टीम इंडिया बाहेर होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरीजसाठी शमीला टीम इंडियात स्थान देण्यात आलं होतं. पण त्याला कोविड-19 ची लागण झाली. त्यामुळे तो सीरीज खेळू शकला नाही.
बीसीसीआयसमोर पर्यायच नव्हता
मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी सुद्धा फिट झाला नाही. मोहम्मद शमीचा याआधी टी 20 क्रिकेटसाठी विचार करण्यात आला नव्हता. निवड समितीने वयाला प्राधान्य दिलं व त्याची टी 20 मालिकांसाठी निवड केली नाही. पण जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे बीसीसीआयसमोर पर्यायच उरला नाही.
शमी ऑस्ट्रेलियात किती सामने खेळलाय?
मोहम्मद शमीची निवड करण्यामागे त्याचा ऑस्ट्रेलियातील अनुभव सुद्धा एक कारण आहे. ऑस्ट्रेलियात मोहम्मद शमी 8 टेस्ट आणि 14 वनडे सामने खेळलाय. तिथे शमी फक्त एक टी 20 सामना खेळलाय.
शमीने टी 20 मध्ये किती विकेट घेतल्यात?
मोहम्मद शमीच टी 20 मध्ये खास प्रदर्शन नाहीय. 17 टी 20 सामन्यात त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमी रेट 9.54 रन्स प्रति ओव्हर आहे. आयपीएल 2022 मध्ये 16 सामन्यात त्याने 20 विकेट घेतल्यात. यंदा तो गुजरात टायन्सकडून खेळला. याच टीमने आयपीएलच यंदाच्या सीजनच जेतेपद पटकावलं.