MPL 2023 RJ vs CSK | धोनीचा सहकारी पुन्हा अपयशी, 15 चेंडूत रत्नागिरीच्या दिव्यांगने CSK विरुद्ध मॅचची दिशा बदलली

| Updated on: Jun 21, 2023 | 7:59 AM

MPL 2023 RJ vs CSK | दिव्यांग हिंगणेकरची तुफान बॅटिंग. दिव्यांगने आपल्या खेळाने मन जिंकून घेतलं. तो टॉप ऑर्डरमध्ये आला असता, तर चित्र अजून वेगळं दिसलं असतं. या मुलाने 15 चेंडूत कमाल केली.

MPL 2023 RJ vs CSK | धोनीचा सहकारी पुन्हा अपयशी, 15 चेंडूत रत्नागिरीच्या दिव्यांगने CSK विरुद्ध मॅचची दिशा बदलली
CSK Captain Ms Dhoni
Image Credit source: PTI
Follow us on

पुणे : महाराष्ट्र प्रिमीअर लीग स्पर्धेत मंगळवारी डबल हेडर सामने झाले. पहिला सामना कोल्हापूर टस्कर्स आणि सोलापूर रॉयल्समध्ये झाला. या मॅचमध्ये कोल्हापूरने सोलापूरवर 26 धावांनी आरामात विजय मिळवला. दिवसातील दुसरा सामना रत्नागिरी जेट्स आणि छत्रपती संभाजी किंग्समध्ये झाला. महाराष्ट्र प्रिमीअर लीग स्पर्धेतील हा 9 वा सामना होता. MPL 2023 स्पर्धेत महाराष्ट्रातील युवा खेळाडू आपली छाप उमटवतायत. IPL च्या धर्तीवर सुरु झालेल्या या T20 लीग क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन सेंच्युरी पाहायला मिळाल्या आहेत.

अंकित बावने आणि अर्शिन कुलकर्णी या दोन युवा खेळाडूंनी शतकी खेळी केली. कालच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्सने पहिली बॅटिंग केली.

दिव्यांग हिंगणेकरचा मन जिंकून घेणारा खेळ

रत्नागिरीकडून अझीम काझीने 47 चेंडूत 53 धावा, निखिल नाईक 25 चेंडूत 38 धावा आणि दिव्यांग हिंगणेकरने नाबाद 46 धावा केल्या. रत्नागिरी जेट्सकडून दिव्यांग हिंगणेकरने मन जिंकून घेणारा खेळ केला. त्याने तुफान फटेकबाजी केली. अवघ्या 15 चेंडूत 46 धावा चोपल्या. यात 2 फोर, 5 सिक्स आहे. तो लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी आला होता. त्याच्या फटेकबाजीमुळेच रत्नागिरी जेट्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 173 धावा केल्या.

धोनीचा सहकारी अपयशी

या मॅचमध्ये छत्रपती संभाजी किंग्सकडून खेळणारा राज्यवर्धन हंगरगेकर पुन्हा एकदा गोलंदाजीत फेल ठरला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 27 धावा दिल्या. पण एकही विकेट काढला नाही. राज्यवर्धन अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. आता तो आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. भविष्य़ातील खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण MPL 2023 मध्ये त्याला लौकीकाला साजेसी कामगिरी करता आलेली नाही. बॅटिंगमध्ये 3 सिक्स मारुन त्याने 8 चेंडूत 21 धावा केल्या. पण त्याचा टीमला उपयोग झाला नाही.

CSK कडून कोण चांगलं खेळलं?

रत्नागिरी जेट्सच्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना छत्रपती संभाजी किंग्सकडून ओमकार खटपेने 48 चेंडूत सर्वाधिक 60 धावा केल्या. यात 4 फोर, 2 सिक्स आहेत. ओम भोसले 20, शमशुझमा काझी 27 आणि राज्यवर्धन हंगरगेकर 21 धावांची खेळी केली. CSK कडून कोणी मॅचविनिंग खेळी केली नाही. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 156 धावा केल्या. रत्नागिरी जेट्सने छत्रपती संभाजी किंग्सवर 17 धावांनी आरामात विजय मिळवला.