मुंबई: कधीकाळी भारतीय क्रिकेटमध्ये वादळ निर्माण करणारे ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांनी एमएस धोनीचं (MS Dhoni) कौतुक केलं आहे. एमएस धोनी इतर समकालीन खेळाडूंपेक्षा वेगळा का आहे? ते त्यांनी सांगितलं. ग्रेग चॅपल 2005 ते 2007 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे हेड कोच होते. त्यावेळी त्यांनी धोनी सोबत काम केलं आहे. धोनी अत्यंत चणाक्ष, हुशार क्रिकेटपटू असल्याचं त्यांनी सांगितलं. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटमध्ये करीयर सुरु करणाऱ्या धोनीने राहुल द्रविड-ग्रेग चॅपल यांच्या कार्यकाळातही संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
श्रीलंकेविरुद्ध एका वनडेमध्ये धोनीने नाबाद 183 धावांची खेळी केली होती. “भारतीय उपखंडात अनेक शहर आहेत. तिथे प्रशिक्षणाची साधन खूप दुर्मिळ आहेत. युवा क्रिकेटपटू रस्त्यावर, मोकळ्या जागेत कुठल्याही कोचिंगशिवाय खेळतात. तिथेच त्यांचे अनेक स्टार खेळाडू घडले. धोनी अशाच खेळाडूंपैकी एक आहे. तो झारखंड रांची मधून आला आहे” असे चॅपल यांनी इएसपीएन क्रिकइन्फोमध्ये लिहिले आहे.
“भारतात मी एमएस धोनीसोबत काम केलं. तो एक चांगल उदहारण आहे. त्याने स्वत:च टॅलेंट विकसित केलं” असं चॅपल यांनी म्हटलं आहे. धोनी इतरांपेक्षा वेगळा का आहे? त्याबद्दल चॅपल लिहितात, “धोनीने स्वत:ची निर्णय क्षमता आणि रणनीतीक कौशल्य विकसित केलं आहे. त्यामुळे तो इतर समकालीन खेळाडूंपेक्षा वेगळा आहे”