ढाका: टीम इंडिया सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. त्याचवेळी इंडिया-ए टीम सुद्धा बांग्लादेशमध्ये आहे. इंडिया ए आणि बांग्लादेश ए मध्ये सध्या दुसरी अनऑफिशियल टेस्ट मॅच सुरु आहे. हा चार दिवसीय सामना आहे. मंगळवारी मॅचच्या पहिल्यादिवशी बांग्लादेश ए ची टीम फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. यजमान संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बांग्लादेश ए चा पहिला डाव 252 धावात आटोपला. इंडिया ए चा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारमुळे बांग्लादेशची ही स्थिती झाली.
मुकेशने बांग्लादेश ए च्या सहा बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने 15.5 ओव्हर्समध्ये 40 धावा देऊन 6 विकेट काढल्या. त्याच्याशिवाय ऑफ स्पिनर जयंत यादव आणि उमेश यादवने 2-2 विकेट काढल्या.
त्याने बांग्लादेशच कंबरड मोडलं
इंडिया ए ला उमेश यादवने पहिलं यश मिळवून दिलं. त्याने शादमान इस्लामला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. महमदुल हसनला बाद करुन मुकेशने इंडिया ए ला दुसरं यश मिळवून दिलं. त्यानंतर वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने भेदक गोलंदाजी केली. त्याने कॅप्टन मोहम्मद मिथुन (4), जाकीर हसन (46), जाकेर अली (62), आशिकुर जमां (21) मुस्फिक हसन (0) यांच्या विकेटकाढून बांग्लादेशच कंबरड मोडलं.
बांग्लादेशकडून कोणी जास्त धावा केल्या?
बांग्लादेश ए साठी शाहदत हुसैनने सर्वाधिक 80 धावा केल्या. उमेशने त्याचा विकेट घेतला. बांग्लादेशकडून हुसैन शिवाय जाकेर अलीने अर्धशतक झळकावलं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये नाही मिळाली संधी
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपआधी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली मायदेशात तीन वनडे सामन्यांची सीरीज झाली. या सीरीजसाठी मुकेश कुमारची टीममध्ये निवड झाली होती. पण त्याला डेब्युची संधी मिळाली नाही. तिन्ही सामने त्याला बाहेर बसाव लागलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी टीममध्ये निवड होणार आहे, हे समजल्यानंतर मुकेश भावूक झाला होता.
वडिलांना टॅलेंटवर नव्हता विश्वास
मुकेशच्या वडिलांच ब्रेन स्ट्रोकने निधन झालं. त्यावेळी मुकेशने रणजी ट्रॉफीमध्ये सुद्धा डेब्यु केला नव्हता. मुकेश आता शानदार गोलंदाजीने नाव कमावतोय. पण ते यश पहायला आज वडिल हयात नाहीयत. मुकेशमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची प्रतिभा आहे, यावर त्यांना विश्वास नव्हता.