मुंबई: बहुचर्चित मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) कार्यकारिणीची आज निवडणूक होणार आहे. राजकारणी विरुद्ध क्रिकेटपटू (Cricketer) असा सामना या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. निवडणुकीसाठी (Election) आज दुपारी 3 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शरद पवार-आशीष शेलार गट विरुद्ध मुंबई क्रिकेट गट अशी ही निवडणूक आहे.
मतमोजणी किती वाजता?
शरद पवार-आशीष शेलार गटाकडून अमोल काळे अध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. मुंबई क्रिकेट गटाकडून संदीप पाटील रिंगणात आहेत. वानखेडे स्टेडियममधील MCA कार्यालयात संध्याकाळी 7 वाजता मतमोजणी पार पडेल.
11 वर्षानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीतच क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी असा सामना होणार आहे. याआधी विलासराव देशमुख विरुद्ध दिलीप वेंगसरकर असा सामना एमसीए झाला होता.
किती मतदार बजावणार मतदानाचा हक्क?
मुंबई क्रिकेट असोशिएशनचे एकूण 380 मतदार आहेत. त्यापैकी 51 क्रिकेटर्स मतदार आहेत, तर 329 मतदार क्लबचे प्रतिनिधी आहेत. मुंबईतील सर्वपक्षीय राजकारणी विविध क्लबसकडून मतदानाचा हक्क बजावतील. मागच्या काही वर्षांपासून मुंबई क्रिकेट असोशिएशनची धुरा राजकीय व्यक्तींच्या हातात आहे.
बैठकीनंतर शेलार-पवार आले एकत्र
यंदा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार विरुद्ध संदीप पाटील अशी निवडणूक होणार होती. संदीप पाटील शरद पवार गटाच प्रतिनिधीत्व करणार होते. या निवडणुकीआधी एक बैठक झाली. त्यात आशिष शेलार आणि शरद पवार यांचा गट एकत्र आला. आशिष शेलार यांची दोन दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.
संदीप पाटील आपल्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. त्यांच्यासमोर अमोल काळे यांचं आव्हान आहे.
MCA निवडणूक सेलिब्रेटी उमेदवार
संदीप पाटील (अध्यक्ष पद : मुंबई क्रिकेट गट)
अमोल काळे (अध्यक्ष पद : पवार-शेलार गट)
अजिंक्य नाईक ( सचिव पद : पवार शेलार गट-मुंबई क्रिकेट गट)
जितेंद्र आव्हाड (सदस्य पद : पवार-शेलार गट)
मिलिंद नार्वेकर (सदस्य पद: पवार-शेलार गट)
राजकीय मतदार
1) संदीप दळवी (मनसे सरचिटणीस आणि आशीष शेलार यांचे मेहुणे) एमिंग मास्टर क्रिकेट क्लब
2) शुभम प्रसाद लाड ( प्रसाद लाड यांचे चिरंजीव) बॅरोनेट क्रिकेट क्लब
3) विहंग सरनाईक (प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव) बोरीवली क्रिकेट क्लब
4) राहुल शेवाळे ( शिवसेना खासदार) दादर क्रिकेट क्लब
5) सचिन अहिर ( शिवसेना आमदार) एम बी युनियन क्रिकेट क्लब
5) जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस आमदार-माजी मंत्री) मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लब
6) अमोल काळे ( देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय) मस्कती क्रिकेट क्लब
7) उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मेरी क्रिकेट क्लब
8) मिलिंद नार्वेकर ( सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) न्यु हिंदू क्रिकेट क्लब
9) शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) पारसी पायोनियर क्रिकेट क्लब
10) भूषण सुभाष देसाई (सुभाष देसाई यांचे चिरंजीव) प्रबोधन-गोरेगाव
11) आशीष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप ) राजस्थान स्पोर्ट्स क्लब
12) प्रताप सरनाईक (आमदार, बाळासाहेबांची शिवसेना) विजय क्रिकेट क्लब
13) तेजस ठाकरे ( उद्धव ठाकरेंचे चिरंजीव) वेलिंगटन क्रिकेट क्लब
14) आदित्य ठाकरे ( माजी मंत्री- नेता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यंग फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लब
15) रामदास आठवले ( केंद्रीय मंत्री, अध्यक्ष रिपाई) सिद्धार्थ कॉलेज