मुंबई: न्यूझीलंड विरुद्ध T20, वनडे सीरीज त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर झाली. प्रत्येकवेळी कुठल्याही टुर्नामेंटसाठी टीम जाहीर होते, त्यावेळी काही खेळाडूंच नशीब पालटत. जास्त खेळाडूंच्या पदरी निराशाच येते. काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करतात. त्यांना आता संधी मिळेल, असं अनेकांना वाटतं. पण प्रत्यक्षात असं घडत नाही. टीम इंडियासाठी सिलेक्शन कमिटीने खेळाडूंची निवड केली. त्यावेळी मुंबईच्या एका प्रतिभावान खेळाडूवर अन्याय झाल्याची अनेकांची भावना आहे. मूळात म्हणजे हा प्लेयर सातत्याने धावा करतोय. यावेळी या खेळाडूलाही आपली निराशा लपवता आली नाही. मुंबईच्या या प्लेयरच नाव आहे, सर्फराज खान. त्याने सुद्धा आपली निराशा जाहीर केली.
पण असं घडलं नाही
ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांपैकी पहिल्या दोन टेस्टसाठी टीम निवडण्यात आली आहे. मागच्या तीन सीजनपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या सर्फराज खानला संधी मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण असं घडलं नाही. मुंबई क्रिकेट टीममध्ये सर्फराजसोबत खेळणाऱा त्याचा सिनियर सूर्यकुमार यादवची निवड झाली. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.
रात्रभर झोपू शकलो नाही
“आसाम विरुद्ध रणजी मॅच खेळून मी दिल्लीला आलो. संपूर्ण रात्रभर झोपू शकलो नाही. मी स्वत:लाच विचारत होतो, मी त्या स्क्वॉडमध्ये का नाहीय? वडिलांशी बोलल्यानंतर आता मी ओके आहे” असं सर्फराज खान इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाला. तीन सीजनमध्ये सर्फराजने 2 हजारपेक्षा जास्त धावा आणि शतक झळकावली आहेत.
मी पूर्णपणे कोलमडून पडलो
“सिलेक्शन न झाल्यामुळे मला दु:ख झालं. मी पूर्णपणे कोलमडून पडलो होतो. कोणाला सुद्धा असं वाटणं स्वाभाविक आहे. खासकरुन इतके रन्स बनवल्यानंतर तुमचं सिलेक्शन होत नाही. मी माणूस आहे. मशीन नाही. माझ्याही भावना आहेत. मी माझ्या वडिलांबरोबर बोललो. ते दिल्लीला आले. आम्ही दिल्लीमध्ये अभ्यास केला” असं सर्फराज खान म्हणाला.
टीम इंडियात लवकरच संधी मिळेल, असा सर्फराजला विश्वास आहे. फिटनेसच्या मुद्यावर सुद्धा सर्फराजने स्पष्ट केलं. “फिटनेस नसता, तर मी दोन दिवस बॅटिंग करुन दोन-दोन दिवस मैदानावर फिल्डिंग करु शकलो नसतो” असं सर्फराज म्हणाला. यो-यो टेस्ट पास केल्याचाही सर्फराजने दावा केला.